श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा अविरत संघर्ष !

‘श्रीरामजन्मभूमीचा लढा हा किती काळापासून चालत आला आहे ?’, याचे उत्तर बहुतेकांना ठाऊक नसते. सामान्य अपसमजाच्या विपरीत हा लढा काही दशकांचा नसून काही शतके चालू असलेला आहे ! एकंदर इतिहास पहाता हा लढा ख्रिस्तपूर्व काळापासून चालू असल्याचे समजते.

 

१. तेजस्वी बलीदान

श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी एकंदर ७६ लढाया झाल्या, असा इतिहास आहे. सनपूर्व १५० मध्ये ग्रीक राजा मिनंडर (मिलिंद) याने आक्रमण करून अयोध्येतील श्रीरामपुत्र कुश यांनी बांधलेले मंदिर सर्वप्रथम उद्ध्वस्त केले, अशी आख्यायिका कित्येक शतके चालत आली आहे. पुढे शुंगकाळात मिनंडरचा पराभव झाल्यावर रामजन्मभूमी मुक्त झाली; मात्र अयोध्येला तिचे गतवैभव काही अंशात तरी पुनः प्राप्त झाले ते सनपूर्व १०० च्या सुमारास. राजा विक्रमादित्याने तिथे मंदिराची पुनर्बांधणी केली. या पुढील काळात हिंदुस्थानवर इस्लामी आक्रमणे चालू झाली; मात्र राजा दाहीरसारख्या पराक्रमी पुरुषांमुळे या आक्रमणांना पूर्ण यश प्राप्त झाले नाही.

वर्ष १०३० च्या सुमारास गझनीचा महंमद हिंदुस्थानात शिरला आणि येथील रक्तरंजित इतिहासाला प्रारंभ झाला. सोरटी सोमनाथाचे भंजन झाले ते याच काळात ! त्यात सामील असणार्‍या गाझी मसूद सालार याने पुढे स्वतःचा मोर्चा अयोध्येकडे वळवला. श्रीवस्तीचे राजा सुहेलदेव आणि विविध आखाड्यांतील साधू संन्यासी यांनी मिळून सालारचा कडवा प्रतिकार केला अन् अखेरीस बहराईच येथे त्याच्या सैन्याचा दारुण पराभव झाला. या पुढील अनुमाने १२५ वर्षे हिंदुस्थानवर इस्लामी आक्रमणाची झळ बसली नाही. त्यानंतर मात्र अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वरूपात पुन्हा एकदा अमानवी हिंसाचाराचा नंगानाच चालू झाला. बलाढ्य असे देवगिरी साम्राज्यही कोलमडून पडले. राणी पद्मिनीच्या स्वाभिमानी बलीदानाविषयीही आपल्याला कल्पना आहेच. यानंतर पुढील २ शतकानंतर बाबर नामक आणखी एक हिंसक आक्रमक हिंदुस्थानवर चाल करून आला. त्याच्याविषयी सविस्तर माहिती या लेखात पुढे आली आहेच.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

२. बाबर कोण होता ?

अत्याचारी तुर्की शासक तैमूरलंग याचा ५ वा वारस असलेल्या उमरशेख मिर्झा आणि तितकेच अत्याचारी मंगोल शासक चंगीझ खान याच्या वंशातील १४ वी वारस असलेली कुतलुग निगार खानम यांचा मुलगा म्हणजे जहिर उद-दिन महंमद बाबर ! बापाच्या मृत्यूनंतर वयाच्या १२व्या वर्षी त्याच्याकडे अधिकारपद आले. बेगा बेगम, आयेशा सुलतान बेगम, जैनाब सुलतान बेगम, मौसमा सुलतान बेगम, महम बेगम, गुलरुख बेगम, दिलदार बेगम, मुबारका युरुफझाई, गुलनार अघाचा, नाझ्गुल अघाचा अशी त्याच्या बेगमांची (बायकांची) ज्ञात सूची ! देहलीचा बादशहा इब्राहिम लोदीविरुद्ध युद्ध पुकारून बाबराचा हिंदुस्थानच्या राजकारणात प्रवेश झाला. ‘पानिपतचे पहिले युद्ध’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या लढाईत बाबराच्या सैन्याने लोदी सैन्याचा पाडाव केला. यानंतर बाबर हिंदुस्थानात काही लुटमार करील आणि मग निघून जाईल, अशी अपेक्षा होती. त्याच्या मनात मात्र देहलीची गादी कह्यात घेण्याचा विचार पक्का झाला होता. हिंदुस्थानात त्याचा विस्तार होण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा होता, तो मेवाड नरेश महाराणा संग्राम सिंग म्हणजेच राणा संगा यांचा ! राणा संगा आणि बाबर यांच्यात बयाना अन् खानवा अशा दोन लढाया झाल्या. दुसर्‍या लढाईत बाबराच्या तोफखान्यासमोर टिकाव न लागल्याने पराक्रमाची शर्थ करूनही राजपूत सैन्याचा पाडाव झाला आणि बाबराचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. या लढाईनंतर बाबराने ठार केलेल्या राजपूत सैन्याच्या मस्तकांचा ढीग (मिनार) उभा केला आणि स्वतःला ‘गाझी’ हे विशेषण लावून घेतले. जिहादमध्ये सहभागी होऊन मुसलमानेतर लोकांना ठार करणार्‍या व्यक्तीला ‘गाझी’ असे म्हणतात.

२ अ. बाबराचे चारित्र्य : बाबराविषयी मराठी साधनांमध्ये माहिती काढायला गेल्यास पुरेशी माहिती मिळत नाही वा केवळ त्याच्या कौतुकाची गोडवी वाचायला मिळते. बाबराच्या मोहिनीतून खुद्द रियासतकार देसाईही सुटलेले नाहीत ! अन्य समकालीन साधनांचा अभ्यास केल्यास मात्र आपल्याला बाबराचे विकृत चित्र पहायला मिळते ! आदिग्रंथ वा गोस्वामी तुलसीदास यांनी केलेली बाबराची वर्णने बाजूला सारली, तरी बाबराने ‘तुजुक-ए-बाबरी’ या नावाने स्वतःची आत्मकथा लिहिली आहे. मूळ चग्ताई भाषेत असलेल्या या ग्रंथाचे फारसी भाषेतील भाषांतर बाबराचा नातू असलेल्या अकबराने करवून घेतले, ते ‘बाबरनामा’ या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रंथातूनही तो अत्यंत नशेखोर, दारूड्या आणि क्रूरकर्मा होता, हे स्वच्छ दिसते.

२ आ. बाबरापासून अकबरापर्यंत श्रीरामजन्मभूमीविषयी झालेला संघर्ष : बाबराला ख्वाजा अब्बास आणि मुसा आशिकन आमी जलालशहा या २ फकिरांनी राणा संगाविरुद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला होता अन् त्या बदल्यात त्याने ‘अयोध्येत मशीद बांधावी’, अशी मागणी केली होती. प्रत्यक्षात हे दोन्ही फकीर अयोध्येत श्यामानंदांचे शिष्य म्हणून राहिले होते; मात्र अंततः त्यांनी त्यांचे खायचे दात दाखवून दिलेच. राणा संगाच्या पाडावानंतर स्वतःचा शब्द पूर्ण करण्यास बाबराने त्याचा सेनापती असलेल्या मीर बाकीला अयोध्येतील राममंदिर पाडून तेथे मशीद उभारण्याचा हुकूम दिला. त्याला सहज काही मशिदीचे बांधकाम पूर्ण करता आले, असे नाही. महताब सिंह, पंडित देवीदीन पांडे, राणा रणविजय आणि राणी जयराजकुमारी यांच्यासह अयोध्येतील साधू अन् नागा, निर्मोही, निर्वाणी गोरक्ष इत्यादी आखाड्यांचे महंत यांनी मीर बाकीला वेळोवेळी कडवा प्रतिकार केला; मात्र या सार्‍या नायकांचा पाडाव झाला आणि अयोध्येत बाबरी उभी राहिली. हे सारे वर्णन जसवंत नामक एका ‘अवधी’ भाषेच्या कवीने अनुमाने ७० कवितांद्वारे करून ठेवले आहे. कवी जसवंत हा राणी जयराजकुमारीचा समकालीन असल्याचे ‘अवधी’ भाषेच्या अभ्यासकांचे मत आहे. बाबरचा मुलगा हुमायून आणि त्यानंतर नातू अकबर गादीवर येईपर्यंतही रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी संघर्ष चालू होताच. अकबराने या संघर्षावर नामी उपाययोजना केली. त्याने विवादित जागी एक चबुतरा बांधून ‘तेथे हिंदूंनी पूजापाठ करावा आणि त्यात कुणीही अडथळा आणू नये’, असे शाही फर्मान (आदेश) काढले. यामुळे काही काळ तरी संघर्ष थंडावला. हा चबुतरा ‘राम चबुतरा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या काळातही अयोध्येतील ‘रामनवमी उत्सवा’साठी देशभरातून लोक जमत, असे समकालीन संदर्भ मिळतात. अकबराचा कित्ता पुढे जहांगीर आणि शहाजहाननेही गिरवला.

वैद्य परीक्षित शेवडे

३. धर्मांध औरंगजेबाने स्वतः ‘राम चबुतरा’ केला उद्ध्वस्त !

त्यानंतर मात्र या सर्वांवर कडी करणारा धर्मांध औरंगजेब हा देहलीच्या तख्तावर बसला आणि हे चित्र पालटले. औरंगजेबाच्या क्रौर्याचा इतिहास आणि त्याने काशी, मथुरा या हिंदु तीर्थस्थळांना केलेला उपद्रव यांविषयी अनेक समकालीन कागदपत्रे उपलब्ध आहेत. या औरंगजेबने ‘राम चबुतरा’ उध्वस्त केला. सर्वप्रथम हे कार्य करण्यास आलेल्या सय्यद हसन अलीच्या फौजेला बाबा वैष्णवदास यांच्या विनंतीवरून साहाय्यास धावून आलेल्या दशम गुरु गोविंदसिंगजी महाराजांनी चांगलेच जेरीला आणले आणि औरंगजेबचे स्वप्न अधुरे राहिले. असे ३ वेळा घडल्यावर मात्र अस्वस्थ झालेला औरंगजेब स्वतःच अयोध्येवर आक्रमण करण्यास आला आणि त्याने ‘राम चबुतरा’ खणून काढला. ‘सीता की रसोई’ आणि ‘स्वर्गद्वारम’ या २ पवित्र स्थळी त्याने मशिदी बांधल्या. औरंगजेबनंतर बादशाहीचे महत्त्व उत्तरोत्तर न्यून होत गेले.

४. राघोबादादा पेशवे आणि सफदरजंग यांच्यात झालेला करार अन् नवाब वाजीद अली शाहने अवलंबलेले धोरण

पुढे १८ व्या शतकात अयोध्येत नवाबांची सत्ता आली. नवाब सआदत अली खानपासून नवाब वाजीद अली शाह यांच्यापर्यंतच्या कारकीर्दीतही अयोध्येला मुक्त करण्याचे प्रयत्न चालू होतेच. अयोध्येचा तिसरा नवाब शुजाउद्दौलाने अफगाणी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांकडे साहाय्य मागितले. त्या वेळी रघुनाथपंत उपाख्य राघोबादादा पेशवे आणि सफदरजंग यांच्यात ‘अयोध्येसह हिंदूंची ३ महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे हिंदूंच्या कह्यात देण्यात यावीत’, अशा आशयाचा करार झाला. कागदोपत्री झालेला हा करार प्रत्यक्षात मात्र अवतरलाच नाही. नवाब वाजीद अली शाहने मात्र आजवरच्या शासकांच्या तुलनेत वेगळे धोरण अवलंबले. त्याने राममंदिराविषयी हिंदूंच्या श्रद्धांचा सामंजस्याने विचार करण्यास प्रारंभ केला; मात्र याच काळात गुलाम हुसैन नामक एका सुन्नी फकिराने ‘मुसलमानांना हा जिहादच आहे’, असे सांगून भडकावण्यास प्रारंभ केला आणि हे प्रकरण चिघळले. याच काळात श्रीरामजन्मभूमीसाठी आणखी एक लढाई झाली.

५. ब्रिटिशांच्या काळात श्रीरामजन्मभूमीसाठी झालेला लढा

वर्ष १८५७ उजाडले. या वेळी मात्र अयोध्येतील हिंदू-मुसलमान हे सारे मतभेद विसरून ब्रिटिशांविरुद्ध खांद्याला खांदा लावून लढले; मात्र ब्रिटिशांनी हा लढा मोडून काढला आणि त्यात सहभागी असणार्‍यांना शिक्षा देत असतांनाच श्रीरामजन्मभूमीसाठी प्रयत्नरत असणार्‍या बाबा रामचरणदास आणि त्यांना विरोध करणारा अमीर अली या दोघांनाही फासावर लटकवले. येथून पुढे अयोध्या प्रकरणाचा गुंता सुटूच नये, याचीही पुरेपूर काळजी ब्रिटिशांनी घेतली, असे आपल्याला कित्येक न्यायिक प्रक्रिया पाहिल्यावर सहजपणे लक्षात येते.

६. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर झालेला न्यायालयीन लढा

‘श्रीरामजन्मभूमी मुक्तीसंग्राम’, हा केवळ रणांगणात झाला आहे’, असे नसून तो न्यायप्रविष्ट लढाही आहे. २५ मे १८८५ मध्ये महंत रघुवरदास यांच्याकडून अयोध्येच्या राममंदिरासाठी पहिला खटला फैजाबाद जिल्हा न्यायालयात प्रविष्ट झाला. ‘वर्षानुवर्षे पूजा चालू असलेल्या ठिकाणी श्रीराममंदिर बांधण्यास अनुमती द्यावी’, अशी त्यांची मागणी होती. ब्रिटीश सरकारने मात्र या मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्यास सांगितले. स्वातंत्र्योत्तर काळात तरी हे चित्र फारसे कुठे पालटले ? खरे तर वर्ष १९३४ नंतर बाबरी ढाच्यात नमाज पढला जात नसे. वर्ष १९४९ मध्ये मात्र अचानक ‘तिथे नमाजपठण करण्याची अनुमती हवी आणि हिंदूंनी या जागेवरील पूजापाठ बंद करावेत’, अशी मागणी चालू झाली. या वेळी मुसलमान आणि हिंदू अशा दोघांनाही तिथे धार्मिक विधी करण्याची अनुमती देण्यात आली. ‘२२ आणि २३ डिसेंबर १९४९ च्या रात्री वादग्रस्त वास्तूतून प्रकाश आला आणि त्या दैवी प्रकाशात एका गोड बालकाचा चेहरा दिसला’, असे वास्तूचा रखवालदार अब्दुल बरकत याने न्यायालयासमोर शपथेवर सांगितले. याच प्रसंगानंतर तिथे श्रीरामललाचा विग्रह प्रकटला, ज्याला पुढे ‘रामलला विराजमान’ म्हटले जाऊ लागले. २९ डिसेंबर १९४९ या दिवशी न्यायाधीश के.के. नायर यांनी त्या जागेला ‘विवादास्पद’ घोषित केले आणि त्याचा ताबा कलम १४५ अन्वये आपल्याकडे (न्यायालयाकडे) घेतला. १६ जानेवारी १९५० या दिवशी ठाकूर गोपालसिंह विशारद यांनी खटला प्रविष्ट केला. त्यात ‘अनुमती मिळूनही कुणी मुसलमान नमाजपठण करण्यास बाबरीमध्ये येत नाही. याउलट आम्ही हिंदु गेली १५ वर्षे सातत्याने पूजा करत आहोत. त्यामुळे ही भूमी आम्हाला मिळावी. प्रतिवादी मूर्ती हालवू शकत नाहीत’, असा आदेश देण्याची मागणीही त्यात करण्यात आली. त्यास मान्यता मिळाली.

५ डिसेंबर १९५० या दिवशी महंत रामचंद्र परमहंस यांनी आणखी एक दावा प्रविष्ट केला. त्यात ‘विवादित जागा ही हिंदु धर्मस्थान असल्याचे मान्य करून ती हिंदूंच्या कह्यात देण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली. या खटल्याला ठाकूर गोपालसिंह विशारद यांच्या खटल्याशी जोडण्यात आले.

यानंतर तब्बल १२ वर्षांनी १८ डिसेंबर १९६१ दिनी सुन्नी वक्फ बोर्डाने विवादित जागेवरील स्वतःचा दावा सांगणारा खटला प्रविष्ट केला. वास्तविक पहाता ‘भारतीय मुदत अधिनियम’ (इंडियन लिमिटेशन ॲक्ट)नुसार ‘इतक्या काळाने दावा करणेच कायदाबाह्य होते’; मात्र तरीही हा खटला उभा राहिला. खरेतर या भूमीविषयी सुन्नी वक्फ बोर्डाने काही भूमिका घेण्याचा संबंधही नव्हता; कारण वर्ष १९४६ मध्ये वक्फ बोर्डाने नेमलेल्या समितीने ‘सदर वास्तू शिया आहे’, असे सांगितले होते; मात्र अयोध्येविषयी प्रविष्ट केल्या गेलेल्या या खटल्याची कारवाईच पुढे चालली आणि अखेरीस वर्ष २०१० मध्ये अलाहबाद उच्च न्यायालयाने या खटल्याविषयी स्वतः निर्णय देत रामजन्मभूमीची एक तृतीयांश विभागणी करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आणि माननीय सरन्यायाधिशांनी घोषित केल्यानुसार जानेवारी २०१९ पासून या खटल्याच्या सुनावणीचे कार्य चालू झाले.

७. बाबरी ढाचा पाडण्यासाठी झालेली कारसेवा आणि त्यामागची पार्श्वभूमी

‘कारसेवा’ हा शब्द मूळ संस्कृत शब्द ‘करसेवा’, म्हणजेच स्वहस्ते केलेली सेवा’, या शब्दाचा अपभ्रंश आहे. १९ फेब्रुवारी १९८१ या दिवशी तमिळनाडूतील मीनाक्षीपूरम येथे शेकडो हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले. देशभरात या घटनेचे संतप्त प्रतिसाद उमटले. वर्ष १९६४ मध्ये जन्माला आलेल्या विश्व हिंदु परिषदेने या निमित्ताने धर्मांतराविरुद्ध जनजागृती करण्यास देशभरात ‘विशाल हिंदू संमेलने’ आयोजित करण्यास प्रारंभ केला. ६ मार्च १९८३ या दिवशी झालेल्या अशाच एका विराट हिंदू संमेलनात काँग्रेस नेते दाऊ दयाल खन्ना यांनी काशी, मथुरा आणि अयोध्या या धर्मस्थळांच्या मुक्तीचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनाही पत्र लिहून कळवले. अपेक्षेनुसार पत्राकडे दुर्लक्ष केले गेले. सोमनाथाचा जीर्णोद्धार करणार्‍या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, के.एम. मुन्शी, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या कृतीनुसार चालण्याचे काँग्रेसने केव्हाच बंद केले होते. विशेष म्हणजे शिया नेते डॉ. हुजूर नवाब यांनी मात्र खन्ना यांच्या मागणीस जाहीर पाठिंबा दर्शवला !

७ अ. ‘रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’ची स्थापना : वर्ष १९८४ मध्ये प्रथम ‘धर्मसंसद’ पार पडली आणि त्याच वेळी ‘रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरक्ष पीठाधीश महंत अवैद्यनाथ हे समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. या काळापर्यंत अयोध्येतील मंदिरात केवळ पुजारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनाच केवळ पूजेपुरतेच जाण्याची अनुमती होती. अन्य वेळी तेथे कुलूप ठोकण्यात येई. सप्टेंबर १९८४ मध्ये ‘श्रीराम-जानकी यात्रा’ आणि तत्पश्चात ‘ताला-खोलो आंदोलन’ (कुलूप उघडा आंदोलन) हाती घेण्यात आले. मार्च १९८५ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन राजीव गांधी सरकारला आवाहन करण्यात आले, ‘पुढील एक वर्षात सरकारने कुलूप न काढल्यास कुलूप तोडण्यात येईल.’ विशेष म्हणजे इंदिराजींच्या हत्येच्या पश्चात सत्तेत आलेल्या राजीव यांच्या काळात लगोलग न्यायिक सूत्रे हलली आणि १ फेब्रुवारी १९८६ या दिवशी कुलूप काढण्याचा आदेश देण्यात आला. अर्थात् हाही काही श्रद्धा वा सत्य यांच्या जाणिवेतून निर्माण झालेला पालट नव्हता, तर शहाबानो प्रकरणानंतर हिंदूंना चुचकारण्यासाठी राजीव गांधी यांनी खेळलेला हा डाव होता. या निर्णयाविरोधातही सुन्नी वक्फ बोर्डाने तात्काळ न्यायालयात धाव घेतली; मात्र त्याने काही उपयोग झाला नाही.

७ आ. मुसलमान नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे करत ‘जिहाद’चा नारा लावणे : वर्ष १९८७ मध्ये विश्व हिंदु परिषदेने हिंदु-शीख ऐक्यासाठी सद्भावना यात्रा चालू केली. दुसरीकडे शहाबानो प्रकरणानंतर मुसलमान कट्टरपंथीय विष ओकू लागले होते. ३० मार्च १९८७ या दिवशी देहलीच्या बोट क्लबवर रॅली घेण्यात आली. याप्रसंगी शाही इमामांसह (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणार्‍या प्रमुखांसह) अन्य कित्येक मुसलमान नेत्यांनी अतिशय प्रक्षोभक भाषणे करत ‘जिहाद’चा नारा लावला. पुढील काही काळातच याचे दुष्परिणाम दिसून आले आणि मेरठसमवेत कित्येक भागांत दंगली उसळल्या. चिथावणीखोर भाषणे करणार्‍यांवर मात्र काहीही कारवाई केली गेली नाही.

७ इ. रामजन्मभूमीच्या ठिकाणी शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडणे : या सार्‍या वातावरणात जानेवारी १९८९ मध्ये प्रयागराज येथे घेण्यात आलेल्या तृतीय धर्मसंसदेत घोषणा करण्यात आली, ‘३० सप्टेंबर १९८९ या दिवशी सर्व गावांत ‘श्रीराम शिलापूजना’चा कार्यक्रम होईल आणि ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी अयोध्येत शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडेल. या मधल्या काळात शिया मुसलमानांनी ‘सुन्नी वक्फ बोर्डाने विवादित भूमी हिंदूंना सुपुर्द करावी’, असे पुनश्च आवाहन करून झाले. राममंदिर हा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. शिलान्यासाच्या कार्यक्रमात अडथळे आणण्याचे सरकारी प्रयत्न चालू झाले. सार्‍या अडथळ्यांवर मात करत ठरल्याप्रमाणे ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडला.

७ ई. समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांनी केलेले क्रौर्य : पुढील वर्षभरात बरीच धामधूम उडाली आणि अखेरीस ‘ऑक्टोबर १९९० मधे पुन्हा कारसेवक अयोध्येत जमणार’, असे ठरले. या वेळी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी अयोध्येत ‘परिंदा भी पर नहीं मार सकता ।’ (पक्षीही उडू शकत नाही) असे घोषित केले. तरीही ३० ऑक्टोबर १९९० या दिवशी पोलीस व्यवस्थेच्या हातावर तुरी देत कारसेवक अयोध्येत जमलेच. कोठारी बंधूंनी बाबरीवर भगवा फडकावला. या सार्‍या प्रकारानंतर कारसेवकांवर आक्रमण करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. निःशस्त्र अशा रामभक्त कारसेवकांवर गोळ्या चालवण्याचा ‘पराक्रम’ मुलायमसिंह सरकारने केला. ‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार अनुमाने ५०० हून अधिक कारसेवकांना मारले गेले.

७ उ. अखेर बाबरीचा ढाचा भुईसपाट ! : या सार्‍या प्रकारानंतर श्रीरामजन्मभूमी आंदोलनाला अधिक जोर चढला. एप्रिल १९९१ मधील धर्मसंसद आणि त्यानंतर बोट हाऊसवर घेण्यात आलेली सभा यांतून रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीचा संकल्प पुन्हा एकदा घोषित करण्यात आला. आता केंद्रात काँग्रेसचे पी.व्ही. नरसिंह राव, तर उत्तरप्रदेशात भाजपचे कल्याण सिंह यांचे सरकार आले होते. अयोध्येत कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासंबंधीचे निर्देश मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. श्रीराममंदिराविषयी काहीच सक्रीय हालचाल होतांना दिसत नव्हती. अशातच ५ वी आणि ६ वी धर्मसंसद पार पडून वर्ष १९९२ उजाडले. राव सरकारला पुन्हा अयोध्येविषयी विचारले गेल्यावर प्रशासनाचे नैतिक उत्तरदायित्व इत्यादी गोष्टींची कारणे पुढे करण्यात आली. शासनाचा एकंदर रोख लक्षात घेत अखेरीस विश्व हिंदु परिषदेकडून पुन्हा एकदा ६ डिसेंबर १९९२ या दिवशी ‘कारसेवे’ची घोषणा करण्यात आली. याच दिवशी वादग्रस्त वास्तू भुईसपाट करण्यात आली.

८. ‘राम दिवाळी’स महत्तम अर्थ प्राप्त होण्यासाठी

वादग्रस्त वास्तू समतल झाली; मात्र तसे झाल्याने विवादित जागेचा प्रश्न मात्र सुटणार नव्हता. तो सुटणार होता तो न्यायालयात ! दिवाणी न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत असा प्रवास करून श्रीरामललाने स्वतःच्या हक्काचे स्थान आज प्राप्त केले आहे. या अविरत संघर्षाचा पूर्णविराम आपल्याला पहायला मिळणे यासारखा आनंददायी क्षण हिंदू मनासाठी दुसरा कोणता असेल बर ? मात्र मंदिर उभारणीच्या जल्लोष प्रसंगी रामकार्यासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक हुतात्म्याला वंदन करणे आणि त्यासाठी मुळातच हा संघर्ष ठाऊक असणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, तरच मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने होणार्‍या ‘राम दिवाळी’स महत्तम अर्थ प्राप्त होईल.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१८.११.२०२३)