‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत प्रसाद भांडारात सेवा करतांना साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला तेथील साधकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे)

सौ. वर्धिनी गोरल

१ अ १. सेवेचे नियोजन अभ्यासपूर्ण केल्याने सहसाधकांची सेवा सहजतेने होणे 

अ. सौ. वर्धिनी गोरल हिने सेवेचे पूर्व नियोजन आणि प्रत्यक्ष सेवा करतांना करायचे नियोजन अतिशय अभ्यासपूर्ण केले होते. तिने ‘सेवेत येऊ शकणार्‍या संभाव्य अडचणी आणि त्यांचा होऊ शकणारा परिणाम’ यांचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे आम्हाला सेवेतील सहजता अनुभवायला आली.

सौ. अनुराधा निकम

आ. वर्धिनीने केलेल्या नियोजनाप्रमाणे आम्ही (श्री. देवदत्त कुलकर्णीकाका, कु. श्रिया राजंदेकर आणि मी) एकमेकांना विचारून आणि मोकळेपणाने बोलून सेवा केल्यामुळे आम्हाला पुष्कळ आनंद होत असे. एक से

वा झाल्यावर ‘नंतर कोणती सेवा करायची ?’ हेही वर्धिनी सांगत असे. त्यामुळे ऐन वेळी सेवा आल्यास आमच्याकडून कोणताही ताण न घेता सेवा पूर्ण होत असे.

१ अ २. प्रेमभाव : मी वर्धिनीला ‘सेवा पूर्ण करूनच महाप्रसाद घेते’, असे सांगितल्यावर ती मला म्हणत असे, ‘‘काकू, आधी महाप्रसाद घेऊन या आणि मग उर्वरित सेवा करा.’’ तेव्हा माझे मन भरून येत असे. त्या वेळी माझी व्यवहारातील जीवनाशी तुलना होत असे. श्री. देवदत्त कुलकर्णीकाका ८० व्या वर्षीही करत असलेल्या सेवेविषयी वर्धिनी नेहमी त्यांचे कौतुक करते. वर्धिनी दैवी बालसाधिका कु. श्रिया राजंदेकर हिच्या समवेत सेवा करून तिला शिकवते. ती श्रियाने केलेल्या सेवेचे कौतुक करते. वर्धिनी श्रियाशी कधी तिच्या वयाची होऊन बोलते, तर कधी ती आईच्या नात्याने श्रियाला तिच्या चुका सांगते.

१ अ ३. मनमोकळेपणा आणि सहजता

अ. वर्धिनी सहसाधकांना ‘त्यांच्या चुका आणि चुकांमुळे होणारे परिणाम’ यांची जाणीव तत्परतेने आणि सहजतेने करून देते. ती आमच्या चुका सांगत असतांना तिच्या चुका सांगण्याच्या पद्धतीचे अन् उद्देशाचे चिंतन करतांना आम्हाला आनंद होतो. तिच्या वागण्या-बोलण्यात अतिशय सहजता असल्याने आम्हाला पुष्कळ आनंद मिळतो.

आ. वर्धिनीचा अन्य सेवांशी संबंधित साधकांशी सातत्याने संपर्क येतो. संबंधित साधकांचे दायित्व असणार्‍या साधकांकडून प्रसादाच्या सेवेविषयीचा तपशील व्यवस्थित किंवा वेळेवर न आल्यास वर्धिनी तत्परतेने ‘त्यांना काही अडचणी आल्या होत्या का ? त्यावर तुम्ही काय उपाययोजना केली ?’, इत्यादी विचारून घेते, तसेच ‘सेवेचा तपशील व्यवस्थित आणि नियोजित वेळेत न दिल्याने येणार्‍या अडचणी अन् होणारे परिणाम’ यांविषयी सहजतेने सांगते.

१ अ ४. निर्मळ मन : तिच्या मनात कुठेच प्रतिमेचा विचार नसतो. तिच्याकडून सेवा करतांना काही चूक झाल्यास ती सहजतेने आणि मनापासून स्वीकारते. तिच्याकडून ‘मन निर्मळ कसे ठेवावे ?’, हे लक्षात येते.

१ अ ५. वर्धिनीकडून ‘संघभावना कशी जोपासावी ?’, हे शिकता येते.

१ आ. श्री. देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८० वर्षे)

श्री. देवदत्त कुलकर्णी

१. श्री. देवदत्त कुलकर्णी यांच्यामधील या वयातील ‘वक्तशीरपणा’ हा गुण कौतुकास्पद आहे. ते ठरलेल्या वेळेत सेवेसाठी येतात, स्वयंसूचना सत्रे करतात आणि महाप्रसाद ग्रहण करतात.

१ इ. कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १२ वर्षे)

कु. श्रिया राजंदेकर

१. कु. श्रिया राजंदेकर हिच्यातील तिच्या वयाच्या मानाने अधिक असलेली प्रगल्भता आणि तिच्यातील सेवेची तळमळ मला अंतर्मुख करते.

२. आलेल्या अनुभूती

२ अ. हलकेपणा जाणवणे : ‘प्रसाद भांडारात सेवा करतांना मला अतिशय हलकेपणा जाणवत असे आणि अत्यल्प वेळेत पुष्कळ सेवा होत असे. माझे शरीर आणि मन यांना जाणवलेला हलकेपणा शब्दातीत आहे.

२ आ. सेवा सहजतेने आणि कृतज्ञताभावाने होणे : माझ्याकडून माझे हात आणि बोटे यांच्याप्रती सहजतेने कृतज्ञता व्यक्त होत असे. ज्याप्रमाणे संत जनाबाई यांचे दळण पांडुरंग दळत होता, त्याप्रमाणे मी सेवा करतांना ‘गुरुदेवच सेवा करत आहेत’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत असे. सेवा करतांना माझ्या मनात ‘गुरुदेवच प्रसाद खोक्यांत भरत आहेत आणि तेच आपल्या प्रिय साधकांना देत आहेत’, असा विचार येत असे.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या वेळी प्रसाद भांडारात सेवा करतांना देवाने मला अनेक गोष्ट शिकवल्या आणि अनुभूती दिल्या’, त्याबद्दल मी  ईश्वरच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (१९.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक