कोल्हापूर – कंदमुळांच्या वनस्पती या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासी यांच्याकडे आहे. या रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याविषयाची माहिती शहरवासियांना अन् खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी यांसाठी २० आणि २१ जानेवारीला कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन शहाजी कॉलेज, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. यात ७० हून अधिक कंदमुळे आणि १६० हून अधिक औषधी वनस्पती तेथे असणार आहेत, अशी माहिती ‘वुई केअर’चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘निसर्ग अंकुर संस्थे’चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक वाली, अमृता वासुदेवन, पल्लवी कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. मधुकर बाचुळकर म्हणाले, ‘‘या प्रदर्शनात सताप, गुगुळ, कुसर, सागर गोटा, बेडकी पाला, अक्कल कारा, दमवेल, काजरा अशा दुर्मिळ औषधी वनस्पती, तसेच कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण या वनस्पतींची कंदमुळे, कंदीका, कंदक, काळी हळद, आंबेहळद यासारखे हळदीचे विविध प्रकार पहाण्यास मिळणार आहेत. यांतील काही कंद विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांच्या पाककृतींची माहिती दिली जाणार आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, आबालवृद्ध तसेच सर्व नागरिक यांनी याचा लाभ घ्यावा.’’