१९ ते २२ जानेवारी या काळात ठाणे येथे आयुर्वेदिक महासंमेलन !

माहिती देतांना डॉ. ज्योती भोजने

ठाणे – ‘आयुर्वेद सर्वांसाठी : जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टीकोन’ हे तत्त्व स्वीकारून ‘अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलना’च्या वतीने, तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने ठाणे येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळा’ आणि ‘ए.आय.ए.सी. कॉन २०२४’ आयोजित करण्यात आले आहे. येथील राम गणेश गडकरी रंगायतन आणि श्री समर्थ सेवक मंडळ येथे १९ ते २२ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन पार पडणार आहे, अशी माहिती डॉ. ज्योती भोजने, डॉ. राजेंद्र प्रसाद शर्मा आणि डॉ. किरण पंडित यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट’च्या अध्यक्ष पद्मश्री, पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, केंद्रीय आयुष मंत्री सरबानंद सोनोवल, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. महेंद्र मुंजापरा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

तणाव नियोजन, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधीविकार व्यवस्थापन, योग आणि सत्वावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदानुसार त्वचा आणि केस यांची काळजी, स्त्रीविकारांचे व्यवस्थापन, पचन विकारांचे व्यवस्थापन, आयुर्वेदिक दिनचर्या आणि स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने महासंमेलनात होणार आहेत.

काही आजारांवर नागरिकांची आयुर्वेदिक तज्ञांद्वारे विनामूल्य पडताळणी करण्यात येणार आहे. त्यांना आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उपलब्ध असणार आहे. येथील मैदानात ५५ नामांकित आयुर्वेदिक औषधांची वितरण केंद्रे असणार आहेत. तेथे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.