‘अदानी’ आस्थापनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ७ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम !

पुणे – आर्थिक तोट्यात असलेल्या पी.एम्.पी.एल्.ने उत्पन्नवाढीसाठी जागेचा वापर व्यावसायिक दृष्टीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंतर्गत अदानी आस्थापनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ७ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम देण्यात आले आहे. त्यापैकी ४ चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम या आस्थापनाकडून हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून उत्पन्नाच्या ३२.५ टक्के रक्कम पी.एम्.पी.एल्.ला मिळणार आहे.

यासंदर्भात पी.एम्.पी.एल्. प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामध्ये पी.एम्.पी.एल्.ला सर्वाधिक जास्त रक्कम देण्याची सिद्धता अदानी आस्थापनाकडून दर्शवण्यात आली. त्यामुळे त्यांच्यासमवेत करार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ७ ठिकाणी खासगी चार्जिंग स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. पी.एम्.पी.एल्.च्या जागेत उभारण्यात येणारी चार्जिंग स्थानके चालू झाल्यावर अदानी आस्थापनाला मोकळी जागा विनामोबदला वापरण्यासाठी मिळणार आहे.

पी.एम्.पी.एल्.चे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी सांगितले की, अदानी आस्थापनासमवेत करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ४ चार्जिंग स्थानकांची कामे पूर्ण होतील. त्यानंतर चार्जिंग स्थानकांमधून सुविधा देण्यास प्रारंभ होईल.