नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी २ आरोपींना पोलीस कोठडी !

नगर – नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कह्यात घेतलेल्या २ वरिष्ठ अधिकार्‍यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर अर्बन बँकेच्या अपव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अन्वेषण चालू होते. आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या अहवालान्वये प्रदीप पाटील, राजेंद्र लुलिया या दोघांचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्याने त्यांना कह्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता जिल्हा न्यायाधीश एस्.व्ही. सहारे यांनी त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नगर अर्बन बँकेच्या अपव्यवहारप्रकरणी राजेंद्र ताराचंद गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांनी बँकेमध्ये १५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे नमूद केले होते. या घटनेचे अन्वेषण केले असता त्यामध्ये २९१ कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे.