संस्कृत भाषेचे सौंदर्य : संस्कृत श्लोकामध्ये ४ वेळा आलेल्या सुवर्ण शब्दाचे वेगवेगळे अर्थ

सुवर्णस्य सुवर्णस्य सुवर्णस्य च जानकि ।
प्रेषिता तव रामेण सुवर्णस्य च मुद्रिका ॥

अर्थ : हनुमान सीतेला अशोकवनात रामाने दिलेली अंगठी देतो. या प्रसंगात ४ वेळा सुवर्ण शब्दाचा वापर करून सुभाषितकार पुढील वेगवेगळे अर्थ सुचवत आहे.

१. उज्ज्वल रंगाची

२. जिच्यामधील वर्ण, म्हणजे अक्षरे सुंदर आहेत

३. जिचे वजन ८० गुंज आहे आणि

४. जी सोन्याची आहे.

कुमारसम्भवं दृष्टवा रघुवंशे मनोऽदधत् ।
राक्षसानां कुलश्रेष्ठो रामो राजीवलोचनः ॥

वरकरणी वाटणारा अर्थ : कुमारसंभव पाहून रघुवंशावर मन भाळले. कमलासमान नेत्र असणारा राम राक्षसांच्या कुलातील श्रेष्ठ आहे.

भावार्थ : ‘रामाला ‘राक्षसांच्या कुलातील श्रेष्ठ’, असे का म्हटले असावे ?’, असा आपल्याला प्रश्न पडतो. यात कवीची प्रतिभा विशेषत्वाने प्रगट होते. ‘कुमारसंभव’ या शब्दात श्लेष आहे. ‘कु’ म्हणजे पृथ्वी, ‘मार’ म्हणजे नष्ट होणे आणि ‘संभव’ म्हणजे शक्यता. कालीदासाने लिहिलेल्या २ काव्यांचा (कुमारसंभव आणि रघुवंश) उल्लेख करून कवीने पुढील अर्थ सुचवला आहे. ‘रघुवंशातील कुलश्रेष्ठ, कमलासमान नेत्र असणार्‍या रामाने राक्षस पृथ्वीला नष्ट करू शकतात, हे जाणून त्यांचा नाश करण्याचा निश्चय केला.’