‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई’ आणि ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ यांच्या वतीने फेब्रुवारीत व्यापार परिषद ! – डॉ. सुनील मांजरेकर

पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवर

कोल्हापूर – ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई’ आणि ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ यांच्या वतीने २४ आणि २५ फेब्रुवारीला ‘महाबीझ २०२४’ ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद दुबई येथे होत आहे. या परिषदेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे आहेत. उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी परिषद ही एक सुवर्णसंधी असल्याची माहिती ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई’चे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष ललित गांधी, ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष संजय शेटे यांसह अन्य उपस्थित होते.

डॉ. सुनील मांजरेकर पुढे म्हणाले, ‘‘निर्यात वृद्धी, ‘नेटवर्किंग’ आणि ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी तसेच व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी ही परिषद होत आहे. गेल्या दोन दशकांपासून सक्रीय असलेल्या या ७ व्या परिषदेत जगभरातून ९०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग अपेक्षित आहे. यात सुमारे ७५० कोटी रुपयांच्या व्यवसायाची नोंद होण्याची अपेक्षा आहे.’’ या प्रसंगी ललित गांधी म्हणाले, ‘‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ची स्थापना वर्ष १९२७ ला झाली. ही संस्था राज्याच्या व्यापार, उद्योग, व्यावसायिक आणि कृषीपूरक उद्योगांची शिखर संस्था म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र चेंबरने २९ देशांसमवेत सामंजस्य करार केला आहे.’’