श्रीराम सप्ताह विशेष ! (भाग २)
‘मेरे झोपडीके भाग खुल जायेंगे…राम आयेंगे…’ ही धून आज देशभर चहुबाजूंनी गुंजत आहे. श्री रामललाच्या (श्रीरामाच्या बालकरूपाच्या) आगमनाप्रीत्यर्थ आज विविध माध्यमांतून जोरदार सिद्धता चालू झाली आहे. कुणी आरतीचे, कुणी दीपमालांचे, कुणी कथा-प्रवचनांचे, तर कुणी कीर्तनाचे आयोजन करत आहे. गावागावांतील, शहराशहारांतील प्रत्येक मंदिरात काही ना काही कार्यक्रम करण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची लगबग चालू झाली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत प्रत्येक राज्यांतील मंदिरांना, हिंदूंना, भाविकांना श्री रामललाने एका धाग्यात सुंदरपणे गुंफायला आरंभ केला आहे…!
एक अनामिक उत्साह देशभरातील हिंदूंमध्ये संचारला आहे. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय किंवा धार्मिक सण असतील किंवा ‘चंद्रयान’ उतरण्यासारखे सोहळे असतील, हिंदू एकदिलाने एकत्र येतात; परंतु श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा हा अपूर्व सोहळा हा या सर्वांना अपवाद आहे ! खरोखरच ज्या वेळी श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येस परत आले, तेव्हा जसा सृष्टीचा कण अन् कण आनंदाने प्रफुल्लित झाला असेल, प्रत्येक अयोध्यावासी भावविभोर होऊन प्रभूंच्या दर्शनसोहळ्याच्या क्षणासाठी आतुरलेला असेल…तद्वत्च आताही श्री रघुरायाच्या या सोहळ्याची देशभरातील हिंदूंना उत्सुकता आहे. या निमित्ताने देशातील हिंदू ‘जोडले’ जात आहेत ! ‘श्री रामललाच देशभरातील हिंदूंचे मन ‘एका ठिकाणी’ आणू शकतो, त्यांना ‘एक लक्ष्य’ देऊ शकतो’, हा बोध यावरून लक्षात येतो. हिंदूंचे मन अयोध्येकडे वळण्यात एक प्रकारची उत्स्फूर्तता आहे, उत्साह आहे; कारण त्यातून त्यांचा जीव, त्यांचा आत्माराम कुठेतरी सुखावत आहे, आनंदित होत आहे. प्रभु रामचंद्रांनी प्रत्येक हिंदूतील ‘आत्मारामा’ला घातलेली ही साद आहे, जी हिंदूंना संघटित होण्यास बाध्य करत आहे…!
उद्योगपती, अधिवक्ते, आधुनिक वैद्य, अभियंते, तंत्रज्ञ, शिक्षक, लेखक, पत्रकार आदी सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींचे लक्ष श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे लागले आहे. अबालवृद्धांसह हिंदु युवक जोडले जात आहेत. ही जोडण्याची, मनाने एकत्र येण्याची, एक लक्ष्य ठेवून कृती करण्याची, एका ध्येयाने संघटित होण्याची कृती श्री रामललाच हिंदूंकडून करवून घेत आहेत. कधी नव्हे, एवढी हिंदूऐक्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे; परंतु इतके दिवस हिंदूसंघटन होता होता अनंत अडचणी येत होत होत्या; आता मात्र ‘एक नाम… श्रीराम’ ते सहजगत्या करून घेत आहे…!
प्रभु श्रीरामचंद्रांनी वानरसेनेचे संघटन करून, असुरांशी युद्ध करून धर्मविजय प्राप्त केला. आजही दशदिशांनी असुररूपी संकटे राष्ट्राचे तुकडे करत असतांना त्यासाठी ‘केवळ नावच पुरेसे आहे’, याप्रमाणे ‘हिंदूंचे संघटन होत आहे’, ही जाणीवच शत्रूला अस्वस्थ करणारी आहे. हेच संघटन उद्या कृतीशील झाले, तर शत्रूचा निःपात केल्याखेरीज रहाणार नाही, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे आता हिंदु युवा-युवतींचे दायित्व रहाते, ते हे संघटन वाढवण्याचे आणि अधिक घट्ट करण्याचे ! एक राष्ट्रविचार आणि एक धर्मतत्त्व हिंदूंना संघटित ठेवून कार्यरत होऊ लागण्याचे हे संकेत आहेत. श्री रामललाच्या कृपेने एकत्र आलेल्या हिंदूंना एक ‘ठोस समान कृती कार्यक्रम’ निश्चितपणे संघटित ठेवू शकेल ! तेव्हा हिंदूंनो, अजेय, धर्माधिष्ठित, तत्त्वप्रधान प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन रामराज्यासाठी, म्हणजे हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्यासाठी संघटित व्हा आणि आगामी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील ‘एक’ घटक व्हा !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.