२२ जानेवारी या दिवशी होणार्या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष…
प्रभु श्रीरामावर टीका करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणार्यांना हिंदु जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल !राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिबिरात ‘प्रभु श्रीराम हे बहुजनांचे होते, माझे होते. एवढेच नाही, तर ते मांसाहारी होते, जंगलात तिकडे कुठे कंदमुळे मिळणार ? तिकडे कुठे शाकाहार शोधायला जाणार ?’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा वैद्य परीक्षित शेवडे यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवर प्रतिवाद केला. तो या लेखात दिला आहे. |
१. प्रभु श्रीरामांचा आहार कुठला होता ?
अ.‘वाल्मीकि रामायणामध्ये अयोध्या कांडातील २८ सर्गातील १२ व्या श्लोकात प्रभु रामचंद्रांच्या आहाराविषयी संदर्भ दिला आहे. त्यात वनातील जीवन हे कष्टप्रद आहे. त्यामुळे सीतेने प्रभु रामचंद्रांच्या समवेत वनवासात येऊ नये; म्हणून प्रभु रामचंद्र तिला सांगतात की,
अहोरात्रं च संतोष: कर्तव्यो नियतात्मना ।
फलेर्वृक्षावपतितैः सीते दु:खमतो वनम् ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग २८, श्लोक १२
याचा अर्थ असा आहे की, वनातील एकूण जीवन एवढे कष्टप्रद आहे की, त्यात आहार म्हणून आपल्याला झाडावरून गळून पडलेल्या फळांचा वापर करावा लागेल आणि मनावर संयम ठेवून वनात रहावे लागेल.
आ. पुढे १७ व्या श्लोकामध्ये असेही दिसते की,
यथालब्धेन कर्तव्यः सन्तोषस्तेन मैथिलि ।
यताहारैर्वनचरैः सीते दुःखमतो वनम् ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग २८, श्लोक १७
याचा अर्थ जो आहार वनामध्ये मिळेल, तो आपल्याला स्वीकारावा लागतो. त्यामुळे या सर्वांविषयी आपल्याला संतोष मानून रहायचे आहे. वनातील जीवन हे अतिशय कष्टप्रद आहे, हेच श्रीराम सीतेला सांगत आहेत. यात ‘सीतेला वनात येण्यापासून परावृत्त करणे’, हा त्यांचा उद्देश आहे. यात कुठेही श्रीरामांनी असा काही उल्लेख केला नाही की, ‘आपल्याला छान मांसाहार करायला मिळेल’, ‘आपण तेथे छान सहलीसाठी जाऊया.’ केवळ वाल्मीकि रामायणातच नाही, तर आपल्याला कुठल्याही ग्रंथामध्ये या संदर्भातील विविध संदर्भ दिसून येतात.
इ. अयोध्याकांड सर्ग २० मधील २९ व्या श्लोकामध्ये
‘चतुर्दश हि वर्षाणि वत्स्यामि विजने वने ।
कन्दमूलफलैर्जीवन् हित्वा मुनिवदामिषम् ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग २०, श्लोक २९’, असे म्हटले आहे.
याचा अर्थ असा की, मी १४ वर्षे वनवासात राहीन. तो विजनवास असेल. हे करत असतांना कंदमुळे आणि फळे हा माझा आहार असेल. खर्या मुनींप्रमाणे हा माझा आहार असेल.
पुढील शब्द महत्त्वाचे आहेत. ‘हित्वा मुनिवदामिषम् ।’, म्हणजे ‘मुनींप्रमाणे कंद, मुळे आणि फळे यांनी जीवन निर्वाह करत.’ याचा अर्थ ‘मी मांसाहार करणार नाही’, असा आहे. वनवासात मांसाहार हा विषयच येत नाही, हे ते स्पष्ट करत आहेत. आपल्याकडे श्रीराम वनवासाला जाण्याच्या प्रारंभीचे संदर्भ आहे.
ई. फलानि मूलानि च भक्षयन् वने
गिरींश्च पश्यन् सरित: सरांसि च ।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३४, श्लोक ५९
याचा अर्थ असा की, ‘मी भक्षण कशा कशाचे करणार आहे ? मुळे आणि फळे या गोष्टींचे मी भक्षण करीन, तसेच गिरीवनात आणि रानावनात भटकेन.’ हीच गोष्ट अयोध्याकांडातील ५४ व्या सर्गामध्ये प्रयागतीर्थावर भरद्वाज मुनींच्या आश्रमातही प्रभु रामचंद्र परत एकदा सांगतात की,
पित्रा नियुक्ता भगवन् प्रवेक्ष्यामस्तपोवनम् ।
धर्ममेवाचरिष्यामस्तत्र मूलफलाशनाः ।।
– वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ५४, श्लोक १६
याचा अर्थ ते म्हणतात, ‘पित्याच्या आज्ञेने आम्ही सर्व वनवासात चाललो आहेत. या काळात आम्ही फळे आणि कंदमुळे खाऊ. त्यानंतर तेथे आम्ही धर्माचरण करू.’
२. उत्तरकांड हा मूळ रामायणातील भाग नसल्याने जितेंद्र आव्हाड यांनी दिलेला संदर्भ अनधिकृत !
आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये उत्तरतंत्र नावाचा एक भाग असतो. याचा अर्थ मुख्य ग्रंथ पूर्ण झाला आहे. त्यानंतर त्याला ‘ॲनेक्सचर’ (जोडपत्र) जोडले जाते, जे त्या काळात झालेले नाही. महर्षि वाल्मीकि हे प्रभु रामचंद्रांना समकालीन आहेत आणि वाल्मीकि रामायण हे अयोध्याकांडात संपते. अयोध्याकांडाच्या शेवटी रामायणाची फलश्रुती आलेली आहे. आपल्याकडे फलश्रुती आली की, त्याच्या पुढे काही नसते. ‘आय.आय.टी. कानपूर’नेही जो उपक्रम घेतला, तो त्यांनी संकेतस्थळावर ठेवला आहे, त्यात उत्तरकांड नाहीच. उत्तरकांड हे अधिकृत समजले जात नाही. असे असतांना त्यातील संदर्भ शोधून काढण्याचा हा प्रकार आहे.
आव्हाड यांनी दिलेले उत्तरकांड हे मूळ ग्रंथाचा भाग नाही. महाभारताला ‘जय’ नावाचा ग्रंथ म्हटला जातो. जो आधी १ सहस्र श्लोकांचाच होता. त्याचा विस्तार होत तो लक्षावधी श्लोकांपर्यंत पोचला आहे. त्याची उत्पत्ती आणि उत्क्रांती पाहिली, तर त्यात कित्येक गोष्टी येत गेल्या आहेत, जी मूळ महाभारतातील कथा नाही, तर उपाक्षण आहेत. त्याचप्रमाणे फलश्रुती आली की, विषय संपतो. आपण हात धुतले की, ‘जेवण झाले’, असे समजतो.
एक प्रतिज्ञा घेतली की, ती मोडून काढायला प्रभु रामचंद्र हे आजकालचे राजकारणी नाहीत की, ‘मी हे बोललेलोच नाही’, असे म्हणायला. प्रभु रामचंद्र दोन तोंडांनी बोलत नाहीत. एक शब्द दिला की, तो ते पाळतात. श्रीराम एकवचनी आहेत. त्यांच्या एकवचनीत्वाचा कुणाला आदर्श घ्यावासा वाटू नये; पण कपोलकल्पित मांसाहाराचा आदर्श घ्यावासा वाटावा, हीच खरी शोकांतिका आहे.
३. ५०० वर्षांचा संघर्ष न्यायिक पद्धतीने संपुष्टात येत असल्याने आव्हाडांना पोटशूळ !
आव्हाड यांना आताच हा विषय सुचण्यामागे ‘२२ जानेवारीला अयोध्या येथे होणारी प्राणप्रतिष्ठा’, हेच कारण आहे. एखादा ५०० वर्षांचा संघर्ष न्यायिक पद्धतीने संपुष्टात येत आहे. आतापर्यत आव्हाड यांची रामजन्मभूमीविषयीची भूमिका काय होती ? १-२ वर्षांपूर्वी आव्हाड सांगत होते, ‘रामायणातून रावणाला काढून टाका. मग रामायणात काय उरेल, ते सांगा.’ आज ते ‘राम हे विवक्षित (बहुजन) गटाचा असल्याने तो आमचाच आहे’, असे म्हणतात. काही काळापूर्वी ते अशाही मताच्या बाजूने होते, ‘रावण हा मूळ निवासींचा असलेल्यांचा नायक आहे.’ ‘राम-रावण हे युद्ध नेमके कुणामध्ये होते ? बहुजन आणि मूलनिवासी यांच्यात युद्ध झाले होते, असे त्यांना म्हणायचे आहे का ?’, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. श्रीरामांचे पूर्वज मनू आहेत ना ? मग मनुस्मृतीविषयी काय बोलायचे आहे ? अशा भूमिका अडचणींच्या ठरतात. आव्हाडांना ‘ते पुष्कळ आधुनिक विचार व्यक्त करत आहेत’, असे वाटत असले, तरी हा विचार त्यांच्याच अंगलट येणारा आहे. जे रामाला काल्पनिक पात्र ठरवू पहात होते, त्यांना आता प्रभु रामचंद्राविषयी भरून येत आहे. ‘राम आमचाच’, असे ते सांगत आहेत. ही श्रीरामाचीच कृपा आहे.
४. श्रीरामचंद्र त्रिकाल संध्यावंदन करत असल्याने त्यांनी मांसाहार करणे अशक्य !
पूर्वी आपण अयोध्याकांडातील संदर्भ पाहिले आता वाल्मीकि रामायणातील अरण्यकांडातील संदर्भ बघूया. रामरक्षेमधील श्लोक आहे, प्रत्यक्षात तो वाल्मीकि रामायणात आहे.
फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यास्तां भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।
– वाल्मीकि रामायण, अरण्यकाण्ड, सर्ग १९, श्लोक १५
हा श्लोक शूर्पणखेच्या तोंडी आहे. शूर्पणखा खर राक्षसाला सांगते, ‘हे दोघे (राम-लक्ष्मण) बांधव केवळ फळे आणि मूळ खातात.’ प्रत्यक्ष ही शत्रूपक्षातील माणसांनी दिलेली पावती की, ते मांसाहार करत नाहीत. अरण्यकांडातील २० व्या सर्गातील ८ व्या श्लोकानुसार खर आणि दुषण हे दोन राक्षस होते. त्यांना प्रभु श्रीरामचंद्र म्हणतात, ‘‘आम्ही दंडकारण्यात आलेले दोघेही बांधव दशरथाचे पुत्र आहोत. धर्माचा मार्ग अवलंबून केवळ कंदमुळे आणि फळे यांचे सेवन करत आहोत. तुम्ही अकारण आमची अशी हिंसा का करत आहात ?’’ जेथे प्रत्यक्ष श्रीरामच ते काय खात आहेत, हे सांगत आहेत, तर तेथे इतरांनी शंका का निर्माण करावी ? या संपूर्ण वनवासात जागोजागी वर्णन आहे की, श्रीरामचंद्र त्रिकाल संध्यावंदन करत होते. त्रिकाल संध्यावंदन करणार्यांना किती पथ्य पाळावी लागतात, हे आजही ते करणार्यांना चांगले ठाऊक आहे.
५. संत गोस्वामी तुलसीदास यांच्या ‘रामचरितमानस’मध्ये प्रभु रामचंद्र शाकाहारी असल्याचे प्रमाण !
याच गोष्टी पुढे जाऊन संत गोस्वामी तुलसीदास यांनीही ‘रामचरितमानस’मध्ये दिलेल्या आहेत. तेही त्याच पद्धतीने यांच्या दोह्यांमध्ये सांगतात की, ‘कंद मूल फल भरि भरि दोना । चले रंक जनु लूटन सोना’ याचा अर्थ भिन्न प्रजातीच्या असलेल्या लोकांमध्ये जेव्हा प्रभु रामचंद्र गेले, तेव्हा खाण्यासाठी त्यांनी कंदमुळे आणि फळे अर्पण केली. आता हे तर वनवासी जन आहेत ना ? जर ते मांसाहार करतात, तर त्यांनीही रामचंद्रांना मांसाहार वाढला असता; पण त्यांना माहिती आहे की, श्रीरामचंद्रांचा आहार काय आहे ? त्याच पद्धतीचे अधिक वर्णन असे की, ‘भूमि सयन बलकल बसन असनु कंद फल मूल । ते कि सदा सब दिन भिलहिं सबुह समय अनुकूल’ यावरही काही जण म्हणतात की, संत तुलसीदास हे नंतर आले आहेत. ते समकालीन नाहीत. ज्यांनी कधी समकालीन संदर्भ घेतले नाही, त्यांना आताच समकालीन संदर्भासह इतिहास आठवत आहे. हा काळाचा महिमा आहे.
६. साम्यवाद्यांकडून भारतीय संस्कृतीवर बिनबुडाचे आरोप !
साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी अशा प्रकारची राळ उडवण्याची कामे कायमस्वरूपी केली आहेत. आज श्रीराममंदिराची उभारणी ही राष्ट्रमंदिराच्या स्वरूपात होत आहे. ‘परकीय आक्रमकांनी पाडलेल्या आमच्या मानाच्या प्रतिकाची आज पुनबांधणी होत आहे’, असे म्हटल्यावर त्याला पंथांनुपंथांचा भेद दाखवणे, हेही साम्यवादी विचारसरणीची करणी होती. मी आणि तीथरूप सच्चिदानंद शेवडे यांनी लिहिलेल्या ‘राममंदिरच का ?’ या पुस्तकात सर्वोच्च न्यायालयाच्या समोर या साम्यवाद्यांनी जे विविध स्वरूपाचे मत मांडले आहे, ते इतके मजेशीर आणि दिशाभूल करणारे आहे की, मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’, असे सांगून फटकारले. संस्कृतचे तज्ञ नाही; पण संस्कृतची साक्ष देणारे तज्ञ आपल्याकडे होऊन गेले आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवायचा आणि बाहेर येऊन बिनदिक्कतपणे खोटे सांगायचे, असा हा उद्योग एवढी वर्ष चालू होता.
७. हिंदु देवतांची मानहानी करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार थांबणे आवश्यक !
हिंदुविरोधकांकडून केवळ निवडक विचार मांडणे चालू आहे. आव्हाड यांनी दिलेले संदर्भ उत्तरकांडातील आहे. आज रामजन्मभूमी न्यासाने ‘रामो विग्रहवान् धर्म : ।’ (वाल्मीकि रामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ३७, श्लोक १३), म्हणजे ‘श्रीराम हे धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहेत’, हे त्यांचे शीर्षवाक्य म्हणून घेतले आहे. याचा अर्थ ‘प्रभु श्रीराम हे साक्षात् धर्म आहेत.’ रामसेतू तोडणे चालू होते, तेव्हा सर्वाेच्च न्यायालयात स्पर्धा चालू होती की, ‘राम हे काल्पनिक पात्र होते.’ ज्या वेळी रामललाच्या बाजूने पक्षकार म्हणून अधिवक्ता न्यायालयात उभे राहिले, तेव्हाही ‘देवतेचा अशा प्रकारे अधिवक्ता होऊ शकतो का ?’, अशी खिल्ली उडवली गेली आणि आज अचानक ‘राम हे आमचेच आहेत’, असा साक्षात्कार झाला आहे.
गेल्या काही दिवसांत आमदार आव्हाडांवर जे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, त्यात हिंदु धर्माचा अवमान करणे आणि हिंदूंच्या भावना दुखावणे अशाच पद्धतीचे ते गुन्हे आहेत. यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकातील ओळींचाही विकृत अर्थ काढण्याची कामे या माणसाने केली आहेत. कुठलाही ग्रंथ हा मुळातून अभ्यासायचा असतो. समर्थ रामदासस्वामींनी पढतमुर्खांची लक्षणे सांगितली, ती फार महत्त्वाची आहेत. आपण केवळ भाषांतरच वाचत बसायची कि मूळ ग्रंथही कधी वाचला आहे ? तो जर वाचला असता, तर असे प्रश्न कुणालाही पडले नसते. त्यामुळे केवळ राजकीय कथानक पार पाडण्यासाठी या गोष्टी होत असतील, तर हे धोकादायक आहे. याने साध्य काही होणार नाही आहे.
रामाने वनवासात जाण्यापूर्वी एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. ज्या प्रकारे नियती असते, त्यावर कुणाचीच पकड नसते. ज्या गोष्टी होणार असतात, त्या होतच असतात. श्रीरामावर आधीही लांच्छन लावले गेले आणि आजही वेगळ्या प्रकारे लांच्छन लावले जात आहे. लक्षावधी वर्षे होऊनही प्रभु श्रीरामचंद्रांची पूजा होत आहे आणि होत राहील.
‘एक वेळ त्यांनी मांसाहार केला’, असे धरून चालले, तर ‘तो पूजनीय आहे आणि नाही’, असे कथानक कसे मांडले जाऊ शकते ? त्यांनी मांसाहार केला; म्हणून त्यांचा आदर्श घेतो. मग ते एकवचनी असल्याचा आदर्श का घेत नाही ? मर्यादापुरुषोत्तम असल्याचा आदर्श घेत नाही. सत्यवचनी असल्याचा आदर्श घेत नाही. याचा अर्थ आमची चंगळ करण्यासाठी ठराविक आदर्श घेणार. हे करतांना त्यांनी असंख्य भाविकांना दुखावले आहे. या राज्यात लक्षावधी वारकरी माळकरी आहेत. ते कुठल्याही समाजाचे असले, तरी ते मांसाहार करत नाहीत. मग त्यांच्याही भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या आमदार महोदयांनी समाज एकत्र येत आहे, हे पाहून कुठे तरी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा प्रकार केला आहे. ते म्हणाले, ‘‘आमच्यावर शाकाहार लादत आहात.’’ कोण शाकाहार लादत आहे ? ही विशिष्ट ‘मोडस ऑपरेंडी’ असते. आपणच पूर्व पक्ष मांडायचा आणि तो खोडून काढायचा अन् म्हणायचे ‘मी जिंकलो !’ यातून कुठे तरी बाहेर पडले पाहिजे. सामाजिक माध्यमांमुळे आता जनता मूर्ख राहिली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये प्रभु रामचंद्र मांसाहार करत नसल्याचे वाल्मीकि रामायणातील अनेक संदर्भ प्रसारित झाले. या निमित्ताने रामायणात खरोखर काय आहे ? हे आम्हाला जनतेसमोर मांडता आले.’
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
(साभार : वैद्य परीक्षित शेवडे यांचे फेसबुक खाते आणि ‘न्यूज१८ लोकमत’ वृत्तवाहिनी)