Goa Crimes : गोव्यात प्रतिमास सरासरी २ हत्या आणि ८ बलात्कार होतात !

पणजी : वर्ष २०२३ मध्ये गोवा राज्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पहाता राज्यात प्रतिमास सरासरी २ हत्या आणि ८ बलात्कार यांविषयी गुन्हे नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ष २०२२ मधील आकडेवारीशी तुलना केल्यास बलात्काराच्या घटनांमध्ये ३१.४२ टक्के वाढ आणि हत्यांमध्ये ४१.८६ टक्के घट झाली आहे.

वर्ष २०२३ मध्ये उत्तर गोव्यात १६ आणि दक्षिण गोव्यात ९ हत्या मिळून एकूण २५ हत्या झाल्या आहेत. यांपैकी २४ प्रकरणांमध्ये संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे संशयितांना पकडण्याची आकडेवारी ९६ टक्के आहे. वर्ष २०२२ मध्ये ही टक्केवारी ९०.६९ टक्के होती. वर्ष २०२३ मध्ये उत्तर गोव्यात ५८ आणि दक्षिण गोव्यात ३४ मिळून एकूण बलात्काराच्या ९२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील ४ घटनांत पोलिसांना संशयित सापडले नाहीत. इतर ८८ प्रकरणांमध्ये पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे ही टक्केवारी ९५.६५ टक्के आहे.