गोवा : कोमुनिदाद भूमीवरील अतिक्रमणाच्या तक्रारी १ वर्षाच्या आत सोडवण्याचे महसूलमंत्र्यांचे आश्‍वासन

महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात

पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) : कोमुनिदादमधील अतिक्रमणाच्या तक्रारी १ वर्षाच्या आत सोडवल्या जातील, असे आश्‍वासन महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिले आहे. कोमुनिदाद संहितेच्या कलम ६५२ अंतर्गत १४ जानेवारीला घेतलेल्या कोमुनिदाद परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मोन्सेरात पुढे म्हणाले, ‘‘गोवा भूमी बांधकाम निर्बंध कायदा १९९५ अंतर्गत कोमुनिदादच्या भूमींवरील अतिक्रमणाच्या तक्रारी १ वर्षाच्या आत सोडवल्या जातील. प्रशासकांना ते करण्याचा अधिकार आहे. समाजाच्या हितासाठी कोमुनिदाद संस्था आणि कोमुनिदाद संहिता यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात २२३ कोमुनिदाद आहेत. कोमुनिदादचे काम सुरळीत चालावे, यासाठी कोमुनिदाद प्रशासक कार्यरत आहेत. अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्यासाठी काही कोमुनिदाद सर्वेक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोमुनिदाद कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी अडीच कोटी रुपये दिले जातात. त्यामुळे कोमुनिदादच्या भूमींचा वापर योग्य प्रकारे आणि योग्य हेतूसाठी झाला पाहिजे. या परिषदेत झालेल्या ठरावांची कार्यवाही करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.’’

कोमुनिदाद परिषद चालू असतांना सभागृहात प्रवेश न दिल्याने काही लोकांनी निदर्शने केली. यामध्ये प्रा. रामराव वाघ, वाल्मीकि नायक, अधिवक्ता गजेंद्र उसगावकर यांचा समावेश होता. ही परिषद अवैध असल्याचा आरोप त्यांनी केला.