महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ! – पंतप्रधान

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

उरण (रायगड) – ‘अटल सेतू’च्या माध्यमातून युवा वर्गामध्ये नवीन विश्वास निर्माण झाला आहे. अटल सेतू हा विकसित भारताची प्रतिमा आहे. या सेतूच्या माध्यमातून समृद्धी येईल आणि देशाच्या कानाकोपर्‍यात विकास पोचेल. मागील १० वर्षांत भारत पालटला आहे. देशात कोट्यवधी रुपयांचे मोठे प्रकल्प होत आहेत. देशात सुशासन दिसत आहे. या विकासात महाराष्ट्र जोडला जाईल. महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. १२ जानेवारी या दिवशी उरण येथील सार्वजनिक सभेत ते बोलत होते.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,…

१. आमचे चारित्र्य स्वच्छ आणि देशाप्रती समर्पित आहे. जसे चारित्र्य, तशी निष्ठा आणि नीती असते आणि जशी नीती, तसे वर्तन असते. यापूर्वी ज्यांनी देशावर राज्य केले, त्यांनी स्वत:ची तिजोरी भरली. स्वत:च्या कुटुंबाला पुढे नेण्याचे काम केले. अनेक वर्षांपासून देशावर राज्य करणार्‍यांचे चारित्र्य चांगले नसल्याने त्यांना देशात विकास करता आला नाही.

२. आमच्यासाठी लोकार्पण किंवा शिलान्यास हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही. आम्ही लोकांसाठी काम करतो.

३. मेट्रो, पाणी, रेल्वे, रस्ते यांविषयी विविध प्रकल्प देशात निर्माण होत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना केंद्र सरकार आणत असून या योजना महाराष्ट्र शासन पुढे नेत अहे. गर्भवती महिला, नोकरी करणार्‍या महिला त्यांच्यासाठी सुट्टी असो किंवा सुकन्या योजना अशा अनेक योजना केंद्रशासनाने चालू केल्या आहेत.

४. वर्ष २०१४ च्या निवडणुकीपूर्वी रायगडवर गेलो असतांना मी काही संकल्प केले होते. ते पूर्ण होत आहेत. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. मागच्या १० वर्षांत भारत पालटत आहे. १० वर्षांपूर्वी देशात कोट्यवधींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती; मात्र आता प्रकल्पांची चर्चा होत आहे.