काठमांडू (नेपाळ) – नेपाळ पोलिसांनी बौद्ध धर्मगुरु राम बहादुर बोमजन यांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. बोमजन यांचे अनुयायी त्यांना बुद्धाचा अवतार मानतात. ते ‘बुद्ध बॉय’ या टोपण नावाने ओळखले जातात. त्यांच्यावर भक्तांच्या अपहरणाचाही गुन्हा नोंद आहे.
पोलीसदलाचे प्रवक्ते कुबेर कदायत यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर अखेर बोमजन यांना अटक करण्यात यश आले. सरलाही या जिल्ह्यातील एका आश्रमात अल्पवयीन महिला भक्तावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. वर्ष २०१० त्यांनी अनेकांना मारहाण केली होती, अशा तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. ध्यान करतांना एकाग्रता भंग केली; म्हणून मारहाण केली, असे बोमजन यांच्याकडून सांगितले जात असे. वर्ष २०१८ मध्ये एका १८ वर्षीय ख्रिस्ती ‘नन’वर बलात्कार केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर वर्ष २०१९ मध्ये त्यांच्या आश्रमातून ४ अनुयायी बेपत्ता झाले. बेपत्ता अनुयायांच्या कुटुंबियांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.