१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘सेवेने प्रथम शरीर देवापुढे नम्र होते. गप्पा-गोष्टींचा त्याग होत असल्यामुळे वाणीकडून सहजच तप घडते. हात, पाय, कान, डोळे, ही सर्व इंद्रिये जेव्हा सेवेत रमू लागतात, तेव्हा मनही विषय सोडून सेवेकडे खेचले जाते. काया, वाचा आणि मन हे त्रय सेवेत मग्न झाले की, याला ‘त्रिकरण शुद्धी’, असे म्हणतात. त्रिकरण शुद्धी झाली की, पूज्य, पूजक आणि पूजन ही त्रिपुटी येथे रहात नाही. त्यावर देव आपणास अभक्तपणातून मुक्त करून ‘भक्त’, ही पदवी देतो.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव. (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘सेवा’, सुवचन क्र. १३)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. ‘दीनदुबळ्या लोकांना मदतीचा हात पुढे करणे’, हीच खरी सेवा असते ! : ‘प.पू. कलावतीआई सांगतात, ‘देव हा चराचरात दडलेला असतो’, म्हणजेच देवाची सेवा म्हणजे दीन-दुबळ्या, अनाथ, भुकेल्या, तहानलेल्या आणि आजारी, अशा लोकांची सेवा. ‘भुकेलेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, आजारी माणसाची सेवाशुश्रूषा करणे, दीन-दुबळ्या लोकांना मदतीचा हात पुढे करणे’, हीच खरी सेवा असते.
२ आ. सेवा ही ‘निष्काम’ असावी ! : ‘सेवा करतांना मनात कधी स्वार्थीभाव नसावा’, असेही प.पू. कलावतीआई सांगतात. सेवा ही निष्काम झाली पाहिजे. कोणताही स्वार्थ मनात ठेवून सेवा केली, तर ती सेवा निष्फळ ठरते. ‘मला अमुक संस्था सन्मानित करील किंवा अमुक संस्था मला पुरस्कार देईल’, असा विचार मनात ठेवून सेवा करणे, म्हणजे ‘ती निष्काम नसून निष्फळ सेवा’, असेच म्हणावे लागेल. सेवेमध्ये आपले आयुष्य घालवणे, म्हणजेच देवाची सेवा करण्यासारखे आहे. ‘देवाची पूजा करणे, वेगवेगळ्या देवांना वेगवेगळ्या वारी पुजणे’, यांत देवाची सेवा होत असेल’, असे मला वाटत नाही.
नामसंकीर्तन मात्र भक्ताला देवापर्यंत पोचवते. आपण देवाचे सतत नाम घेत राहिलो आणि ‘मी जे काही काम करतो, ते देवासाठीच करतो’, असा विचार मनात ठेवून काम केले, तर ते काम निष्काम कर्मामध्ये मोडले जाते. निष्काम कर्म, म्हणजे कुठल्याही प्रकारची (धन, मान आणि प्रतिष्ठा यांची) आसक्ती न ठेवता केलेले काम.
२ इ. सेवा करण्यासाठी आपण स्वतः सक्षम आणि शक्तीमान झाले पाहिजे ! : सेवा करण्यासाठी माणूस स्वतः मात्र सक्षम असावा लागतो. तो शरिराने निरोगी आणि मनाने खंबीर असावा लागतो. सेवा करतांना मनाची चलबिचल होता कामा नये, तसेच शरीर थकता कामा नये. अव्याहतपणे सेवा करण्यासाठी शरीर आणि मन दुबळे असून चालत नाही; म्हणून आधी आपण स्वतः सक्षम अन् शक्तीमान झाले पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम, प्राणायाम, योगासने आणि ध्यानधारणा केली पाहिजे, तरच आपण सेवेसाठी तयार होऊ शकतो. ‘सेवा करणे’, हे येरागबाळ्याचे काम नव्हे.
२ ई. सेवेचे प्रकार
२ ई १. देवाची सेवा : देवाची सेवासुद्धा अनेक प्रकारे करता येते. यात ‘आमच्या येथील स्वामी समर्थ मठात भक्तांच्या चपलांचे रक्षण करणे, त्यांच्या चपला विशिष्ट खणात ठेवणे आणि त्यांना बिल्ला देणे, भक्तांना स्वामींचा प्रसाद देणे, मंदिर स्वच्छ करणे’ इत्यादी सेवा येतात.
२ ई २. प्राणीमात्रांची सेवा : सेवांमध्ये ‘प्राणीमात्रांची सेवा करणे’, हे सगळ्यांत उच्च मानले जाते. एखादा डॉक्टर खेडोपाडी जाऊन तिथल्या गरीब लोकांची तपासणी करून त्यांना विनामूल्य औषधे देत असला, तर ती एक मोठी आणि उच्च दर्जाची सेवा म्हणता येईल.
अगदी अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाले, तर ‘कोरोना’ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक सामान्य लोकांनीसुद्धा असामान्य अशी सेवा करून समाजावर उपकार केले. ‘रोग्याला रिक्शात घालून रुग्णालयात नेणे, रोग्यांची सेवाशुश्रूषा करणे, रोग्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करणे’, अशी अनेक कामे अनेक सेवाभावी संस्था आणि कार्यकर्ते यांनी केली; म्हणूनच आज आपली ‘कोरोना’पासून मुक्तता झाली.
बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. ‘निराधार महिला आणि अनाथ मुले यांना आश्रमात आश्रय देणे, गरीब मुलांच्या वह्या-पुस्तकांचा खर्च करणे, काही मुले दत्तक घेणे’, अशा अनेक सेवा आज अनेक सेवाभावी संस्था अन् व्यक्ती करत आहेत; म्हणूनच आज आपला समाज बराच सुखी आहे.
२ ई ३. ‘जगाला प्रेम अर्पण करणे’, हीसुद्धा एक सेवाच असते ! : ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात एक अतिशय सुंदर असे गीत आहे. ते इथे दिल्याविना रहावत नाही.
ज्योत से ज्योत जगाते चलो ।
प्रेम की गंगा बहाते चलो ।
राह में आये जो दीन दुखी, सब को गले से लगाते चलो ।।
जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला ।
जो निर्धन है जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा ।
प्यार के मोती लुटाते चलो ।।
या गाण्यातून सेवेचा एक अतिशय सुंदर असा संदेश कवीने दिला आहे. ज्याच्या हृदयात समाज आणि प्राणीमात्र यांविषयी प्रेम दाटून येते, तोच खरा सेवेकरी ठरू शकतो.
‘सानेगुरुजींची ‘खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।’, ही कवितासुद्धा या विषयाला साजेशी आहे’, असे मला वाटते. ते म्हणतात,
जगी जे हीन अति पतित ।
जगी जे दीन पददलित ।
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।
२ ई ४. संसार करणे : हीसुद्धा एक सेवाच असते. ‘मुलाबाळांकडे नीट बघणे, मुलांना सुसंस्कारित करणे, पत्नीच्या सर्व गरजा पुरवणे, मुलांचे शिक्षण घेऊन त्यांना एक चांगला नागरिक बनवणे’, यासुद्धा मोठ्या सेवाच आहेत’, असे म्हणता येईल.
२ उ. संतांनी लिहिलेले ग्रंथ लोकशिक्षण देण्याचे पवित्र कार्य करत असल्याने त्यांतून त्या संतांकडून समस्त मानवजातीची सेवा घडत असते ! : संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण जगावर जे उपकार करून ठेवले, त्याला तोडच नाही. ‘कुठलाही प्रासादिक ग्रंथ निर्माण करणे’, हीसुद्धा एक उच्च प्रतीची मानवाप्रती सेवा आहे. ‘श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता, श्री समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेला दासबोध, संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी लिहिलेली ‘तुकाराम गाथा’, संत नामदेव महाराजांचे अभंग’, हे नुसते ग्रंथ नाहीत, तर ते लोकशिक्षण देण्याचे पवित्र कार्य करत असतात. त्यातून त्या महान संतांकडून समस्त मानवजातीची सेवा घडत असते.
प.पू. कलावतीआई यांनीसुद्धा अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांतील ‘बोधामृत’ हा ग्रंथ शिष्याला योग्य त्या आध्यात्मिक मार्गावर आणून ठेवणारा आहे. हा शिष्याच्या मनातील अनेक आध्यात्मिक प्रश्नांचे समाधान करणारा ग्रंथ आहे.
२ ऊ. सेवेमुळे होणारे लाभ
१. सेवेमुळे आपल्याला लोकांचे आशीर्वाद मिळतात. आपण ज्याची सेवा करतो, त्याच्या गरजा थोड्याफार तरी भागतात आणि तो आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.
२. सेवेमुळे आणि तेही निष्काम सेवेमुळे इतर सर्व ज्योती, म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर अन् अहंकार विझतात, तेव्हा आपल्या मनामध्ये ‘आत्मज्योत’ प्रज्वलित होते आणि आपल्याला ‘आपण शरीर नसून कुणीतरी वेगळे आहोत’, याची जाणीव होते. एकदा का आत्मज्योत प्रज्वलित झाली की, तिचा प्रकाश सर्वदूर पोचतो आणि हळूहळू सेवेच्या माध्यमातून तो माणूस संतपदाकडे वाटचाल करू लागतो.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘तूच देव आणि तूच भक्त. बाकी सर्व ज्योती विझल्या, तेव्हा माझी अंतरज्योत प्रज्वलित झाली. सगळीकडे देव दिसू लागला. एक अशी जागा उरली नाही की, जिथे देव नाही.’
अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।
तुझें तुज ध्यान कळों आले ।। १ ।।
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।
फिटला संदेह अन्यतत्त्वी ।। २ ।।
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ।। ३ ।।
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ।। ४ ।।
वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ।। ५ ।।
निवृत्ति परमानुभव नेमा ।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ।। ६ ।।
३. ‘काया, वाचा, मनोभावे जेव्हा आपण दुःखित, वंचित आणि रोगी यांची सेवा करतो, त्या वेळी आपली त्रिशुद्धी होते’, असे प.पू. कलावतीआई म्हणतात. अशी त्रिशुद्धी झाली की, आपले मन काम-क्रोधादी विषयांपासून दूर जाऊन ईश्वराच्या चरणी विनम्र होते.
४. ‘सेवेत रमलेला आणि सेवेत आपले आयुष्य व्यतीत करणारा माणूस शेवटी देवस्वरूप होतो अन् योग्य त्या आध्यात्मिक मार्गावरून चालत चालत ईश्वरापर्यंत पोचतो’, असे प.पू. कलावतीआई सांगतात; म्हणून प्रत्येकाने आपला संसार सांभाळून प्राणीमात्रांची थोडी तरी सेवा केली पाहिजे.’
– पू. किरण फाटक (शास्त्रीय गायक) डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१०.९.२०२३)