Ram Temple Car Rally Houston: अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ह्यूस्टन (अमेरिका) येथे भक्तांनी काढली वाहनफेरी !

ह्युस्टनमध्ये हिंदु अमेरिकन समुदायाची  वाहनफेरी

ह्यूस्टन (अमेरिका) – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामनगरी सजली आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी देशातच नाही तर जगभरात उत्साह आहे. हिंदु अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी ७ जानेवारीला ह्युस्टनमध्ये ‘जय श्रीराम’च्या जयघोषात वाहनफेरी काढली. ही फेरी मार्गात ११ मंदिरांना भेट देत पुढे गेली.

श्रीराममंदिराच्या छायाचित्रासह भारतीय ध्वज आणि अमेरिकन ध्वज घेऊन ५०० हून अधिक लोक या वाहनफेरीत सहभागी झाले होते. या वाहनफेरीत २१६ चारचाकी वाहने होती. ह्युस्टनचे समाजसेवक जुगल मलानी यांनी झेंडा दाखवल्यानंतर श्री मीनाक्षी मंदिरातून वाहनफेरीला प्रारंभ झाला, तर रिचमंड येथील श्री शरद अंबा मंदिरात तिचा समारोप झाला.

मंदिरात वाहनफेरीचे स्वागत

अनुमाने २ सहस्र ५०० भाविकांनी विविध मंदिरात भजनाच्या गजरात वाहनफेरीचे स्वागत केले. ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि शंखनाद यांमुळे मंदिरात उपस्थित प्रत्येक व्यक्ती मंत्रमुग्ध झालेली दिसत होती. सर्वत्र वातावरण भक्तीमय झाले होते. ‘जणू श्रीरामच ह्युस्टनला आले आहेत’, अशी अनुभूती अनेकांनी घेतल्याचे श्री. उमंग मेहता यांनी सांगितले.