पाक आणि चीन येथील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात ! – अमेरिकेचा अहवाल

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन

वॉशिंग्टन – धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणार्‍या देशांची सूची अमेरिकने प्रसिद्ध केली आहे. या सूचित अमेरिकेने पाक आणि चीन यांचा समावेश केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला विरोध करत, ‘अमेरिकेचा हा अहवाल एकतर्फी आणि भेदभाव करणारा आहे’, असे म्हटले आहे. या सूचीत म्यानमार, रशिया, इराण, उत्तर कोरिया आणि सौदी अरेबिया यांसह अनेक देशांची नावे असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या देशांचा ‘विशेष चिंता’ असलेल्या देशांच्या सूचीत समावेश करण्यात आला आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाशी संबंधित गंभीर प्रकरणे येथे नोंदवण्यात आली आहेत. पाकमध्ये ईशनिंदा कायदा अस्तित्वात आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात अपवापर होत आहे. त्याविषयी चौकशी न केल्याने पाकिस्तानवर जागतिक स्तरावर टीका होत आहे. या कायद्यांचा अपवापर करून तेथील कट्टरतावादी समुदाय हिंदू, शीख, ख्रिस्ती, जैन, बौद्ध आणि अहमदिया मुसलमान या धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करतात.

पाकिस्तान म्हणाला, ‘‘धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. (या हास्यास्पद दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक) आमचा असा विश्‍वास आहे की, धार्मिक असहिष्णुता आणि इस्लामविषयी तिरस्कार यांचा सामना परस्पर समंजसपणा अन् आदर यांच्या आधारावर केला जाऊ शकतो. या सूत्रावर पाकिस्तानने अमेरिकेशी द्विपक्षीय चर्चाही केली आहे.’’

संपादकीय भूमिका

  • पाकमधील हिंदूंची दुःस्थिती सर्वज्ञात आहे. त्यामुळे ‘अमेरिका असा अहवाल काढून गप्प बसणार कि पाकला तेथील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात खडसावणार ? हे पहावे लागेल !