महाराष्ट्रातील ३५५ साधू-संत यांनाही खास निमंत्रण !
नागपूर – अयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. त्यानिमित्ताने राज्यभर गृहसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने घरोघरी अक्षता आणि मंदिर यांची छायाचित्रे पाठवून ‘२३ जानेवारीपासून श्रीरामाच्या दर्शनासाठी या’ असे आग्रहाचे निमंत्रण पाठवले जात आहे. आधी महाराष्ट्रात ९५ लाख कुटुंबांना असे निमंत्रण पाठवण्याचे नियोजन होते; मात्र आता कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांची राममय भावना लक्षात घेऊन १ कोटी ५ लाखांहून अधिक कुटुंबापर्यंत हे निमंत्रण जाईल, असा अंदाज विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री श्री. गोविंद शेंडे यांनी व्यक्त केला आहे.
श्री. गोविंद शेंडे म्हणाले की, श्रीरामाच्या मंदिरासाठी लोकांच्या भावना अप्रतिम आहेत. आम्हाला ही कधी नव्हे असे अनुभव येत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते उत्साहाने अक्षता पोचवून श्रीरामाच्या दर्शनासाठी अधिकाअधिक लोकांपर्यंत जाण्याचे प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील ३५५ साधू आणि संत यांनाही या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून एकूण ८८९ जणांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये ५३४ विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.