प्रथितयश उद्योगपती आदर पूनावाला आणि राधिका गुप्ता यांनीही केला मालदीवचा निषेध !

अदार पूनावाला

नवी देहली – मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून भारतातील प्रथितयश उद्योगपतींनीही मालदीवचा निषेध केला आहे. कोरोनावर लस बनवणार्‍या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ‘एक्स’ म्हटले की, ‘आपल्या देशात अकल्पनीय क्षमता असलेली अनेक अद्भुत पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा अजूनही संपूर्ण शोध लावणे शेष आहे. मी प्रसारित केलेल्या छायाचित्रांवरून तुमच्यापैकी कुणी अंदाज लावू शकेल का की, या स्वर्गसमान जागा भारतातील आहेत.’

‘एडलवाईस एम्.एफ्.’आस्थापनाच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनीही मालदीवला फटकारले. त्या म्हणाल्या, ‘मी भारतीय पर्यटनाच्या क्षमतेने प्रभावित झाले आहे आणि नेहमी विचार करते की, लक्षद्वीप अन् अंदमान असतांना मालदीवला जाण्यासाठी इतके पैसे का खर्च करायचे ? पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौर्‍यामुळे या ठिकाणाविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. आमच्या ‘हॉटेल ब्रँड्स’ने आम्हाला वेळोवेळी दाखवून दिले आहे की, अन्यांपेक्षाही आपण सरस व्यवस्था निर्माण करू शकतो. जागतिक दर्जाचे पर्यटनाचे अनुभव सिद्ध करण्यासाठी भारतीय आदरातिथ्याचा सर्वाधिक लाभ घेऊया.’