‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ तात्काळ रहित करा ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

सातारा येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

सातारा येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाला उपिस्थत हिंदुत्वनिष्ठ

सातारा, ७ जानेवारी (वार्ता.) – वर्ष १९९१ मध्ये श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन चालू होते. त्याचवेळी हिंदूंकडून काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळे अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली. ही मागणी चिरडण्यासाठी तत्कालीन केंद्रातील नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (प्रार्थनास्थळे कायदा) हा कायदा केला. या कायद्यामुळे श्रीरामजन्मभूमी वगळता १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी धार्मिक स्थळांची जी स्थिती होती, तीच ग्राह्य धरली गेली. यानुसार वर्ष १९४७ पूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करून, बळजोरीने मंदिरे कह्यात घेऊन तोडफोड करून तेथे मशिदी आणि चर्च उभारण्यात आली असतील, तर तिथे पुन्हा मंदिरे उभी करता येणार नाहीत, असा कायदा करण्यात आला. हा कायदा हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या विषयातील एक अन्यायकारक आणि काळा कायदा आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ हा कायदा तात्काळ रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.

सातारा येथील निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना संत आणि हिंदुत्वनिष्ठ

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त ते बोलत होते. या वेळी नाथ संप्रदायाचे पू. सोमनाथगिरी महाराज, वारकरी संप्रदायाचे पू. कृष्णराव क्षीरसागर महाराज, वेदभवन गुरुकुल पिठाचे दिनेश पाठक गुरुजी, हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, कार्यकारिणी सदस्य उमेश गांधी, विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय कोषाध्यक्ष रामचंद्र नवलेकर, रवींद्र ताठवडेकर आदी मान्यवर आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रभु श्रीराम यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍यांना मतदानाद्वारे उत्तर द्या ! – जितेंद्र वाडेकर, माजी शहरमंत्री, विहिंप

५५० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभु श्रीराम यांचे मंदिर होत आहे. प्रभु श्रीराम यांच्या राज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता, कुणी दु:खी-कष्टी नव्हते, सर्वत्र न्यायाचे राज्य होते; म्हणून आपण लाखो वर्षांनंतरही आपण रामराज्याचे स्मरण करतो; मात्र आता स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रभु श्रीराम आमचे कसे होते, त्याचे दाखले देण्यासाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे ‘राम मांसाहारी होता’, असे म्हणून त्यांनी प्रभु श्रीराम यांचा अपमान केला आहे. अशी वक्तव्ये करून आव्हाड यांनी समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दु:खावल्या असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा. तसेच हिंदूंनीही येणार्‍या निवडणुकीत मतदानाद्वारे आव्हाड यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.