‘सौ. रिभाताईने मला ही अनुभूती सांगितली. त्या वेळी ‘यजमान आता नामजप करतात’, हे सांगत असतांना त्यांचा भाव जागृत झाला होता.’
– सौ. नम्रता शास्त्री (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ७२ वर्षे), नागपूर |
१. ‘यजमानांना कार्यालयातून काढून टाकण्यात येईल’, असे साधिकेला समजणे; मात्र ‘गुरुदेव पाठीशी आहेत’, या श्रद्धेमुळे तिला शांत रहाता येणे आणि तिने तिच्या यजमानांनाही तसेच सांगणे
‘नोव्हेंबर २०२० मध्ये माझ्या यजमानांना ‘कार्यालयातील आर्थिक अडचणीमुळे कार्यालयातून काढून टाकण्यात येईल’, असे समजले. याविषयी समजल्यानंतरही माझे मन शांत होते. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) पाठीशी आहेत. जे होते, ते भल्यासाठीच होते. ईश्वराला यातून काहीतरी शिकवायचे आहे’, अशी माझी श्रद्धा होती. मी माझ्या यजमानांनाही असेच सांगत होते.
२. साधिकेने मनोमन सर्व अडचणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगणे
नोकरीवरून काढून टाकणार असल्याचे समजल्यावर यजमानांना काळजी वाटत होती. ते म्हणाले, ‘‘काढून टाकल्यामुळे माझ्या आयुष्याची हानी होईल.’’ त्यांचे असे बोलणे ऐकूनही माझ्या मनात ‘असे होऊच शकत नाही. परात्पर गुरु डॉक्टर आहेत ना !’, असे सकारात्मक विचार येत होते. मी गुरुदेवांना सर्व अडचणी मनोमन सांगितल्या.
३. त्यानंतर काही दिवसांनंतर मला समजले, ‘आस्थापनातील अधिकार्यांनी माझ्या यजमानांना कामावरून काढून टाकले असले, तरीही त्या अधिकार्यांनी यजमानांना दिलेल्या नोकरीविषयक अनुभवाच्या पत्रात (experience letter) चांगला अभिप्राय दिला आहे. त्यामुळे यजमानांना दुसर्या आस्थापनात नोकरी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नव्हती.’
४. साधिकेच्या यजमानांना त्यांच्या इच्छेनुसार चांगल्या आस्थापनात नोकरी मिळणे आणि साधिकेने गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
काही दिवसांनंतर यजमानांना एका चांगल्या आस्थापनात नोकरी मिळाली. माझ्या यजमानांची मोठ्या आस्थापनात काम करण्याची इच्छा होती आणि ती अशा रितीने पूर्ण झाली. केवळ गुरुदेवांच्या असीम कृपेमुळे आता यजमान सहजतेने नोकरी करू शकत आहेत.
५. साधिकेच्या यजमानांची गुरुदेवांवरील श्रद्धा वाढणे आणि त्यांनी साधनेला आरंभ करणे
पूर्वी माझ्या यजमानांची परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा नव्हती; पण या प्रसंगानंतर त्यांची परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धा वाढली. आता यजमान नामजप आणि प्रार्थना करतात. ते म्हणतात, ‘‘या कठीण परिस्थितीतून मला बाहेर काढणे केवळ ईश्वराच्याच हातात होते.’’
तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘देवाला माझ्या यजमानांना साधनेत आणायचे होते. त्यासाठीच देवाने हा प्रसंग निर्माण केला.’
– सौ. रिभा मिश्रा, नागपूर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |