गोवा येथील साधक श्री. अतुल दिघे यांना आलेल्या विविध अनुभूती

१. ध्यानमंदिरात नामजप करतांना देवतांची चित्रे आणि त्यांच्या मागील भिंत हलतांना दिसणे

श्री. अतुल दिघे

१ अ. ध्यानमंदिरात जप करतांना श्रीरामाच्या चित्राकडे लक्ष अधिक वेधले जाणे : ‘२२.९.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजप करत होतो. ‘ध्यानमंदिरात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे निर्गुण अस्तित्व अनुभवूया’, असा विचार माझ्या मनात आला. ध्यानमंदिरातील सर्व देवतांची चित्रे अल्प-अधिक प्रमाणात निर्गुण झाली आहेत. त्यामुळे ‘समोर जे दिसत आहे, ते अनुभवले, तर मला ‘निर्गुण तत्त्वाची अनुभूती कशी असते, ते शिकायला मिळेल’, असे मला वाटत होते. मी नेहमीप्रमाणे डोळे बंद करून मनात निर्गुण तत्त्वाचा ‘महाशून्य’ हा जप करत होतो. अधूनमधून मी डोळे उघडून माझ्यावर आलेले नकारात्मक शक्तीचे त्रासदायक आवरण काढत होतो. त्या वेळी माझे लक्ष समोर देवतांच्या चित्रांकडे जात होते. त्यातही मध्यभागी असलेल्या श्रीरामाच्या चित्राकडे माझे लक्ष अधिक वेधले जात होते.

१ आ. श्रीरामाच्या चित्राकडे पहात नामजप करत असतांना अचानक ‘सर्व देवतांची चित्रे आणि त्यामागील भिंत हालत आहे’, असे स्थूलातून दिसणे आणि आणि हे हालणे लोलक किंवा समुद्रातील बोटीच्या हालण्याप्रमाणे आहे’, असे वाटणे : श्रीरामाच्या चित्राकडे पहात नामजप करत असतांना मला अचानक ‘सर्व देवतांची चित्रे आणि मागील भिंत हालत आहे’, असे स्थुलातून दिसले. मला त्यांचे हे हालणे, म्हणजे झोका घेण्याप्रमाणे किंवा लोलक (पेंड्यूलम्) किंवा समुद्रातील बोट हालण्याप्रमाणे वाटत होते. त्या वेळी मला चित्रे आणि भिंत सगळीकडे, म्हणजे पुढे-मागे, वर-खाली आणि डावी-उजवीकडे असे सगळ्या दिशेने हालतांना दिसत होती.

१ इ. ‘सर्वच देवतांची चित्रे हालत आहेत’, असे जाणवणे आणि त्यांच्याकडे पाहून चांगले वाटणे : त्यानंतर मी ‘हे हालणे केवळ श्रीरामाच्या चित्राकडेच बघून होत आहे कि इतर देवतांच्या चित्रांकडे बघूनही तसेच जाणवत आहे ?’ असा प्रयोग केला. तेव्हा मला ‘सर्व देवतांची चित्रे हालत आहेत’, असे जाणवले. हे पहात असतांना मला पुष्कळ चांगले वाटत होते. ‘तेथेच बसून हे अनुभवत रहावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी ‘हे नेमके काय आहे ?’, हे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘ही वायुतत्त्वाची अनुभूती आहे’, असे मला वाटले.

(देवतांची चित्रे आणि त्यांमागील भिंत हालणे, ही वायुतत्त्वाची अनुभूती आहे. – संकलक)

२. ‘श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीकडे खेचला जात आहे’, असे जाणवून आनंद वाटणे

मी सनातनच्या रामनाथी आश्रमात जातो, तेव्हा मी श्रीसिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतो. ऑगस्ट २०२३ मध्ये मी श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा होतो आणि मूर्तीकडे पहात होतो. तेव्हा ‘मी मूर्तीकडे खेचला जात आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा मला माझ्या आज्ञाचक्रावरही चांगल्या संवेदना जाणवत होत्या. मला आनंद होत होता.

प.पू. डॉक्टरांनी मला या अनुभूती दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अतुल दिघे , नागेशी, गोवा. (२२.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक