Maldives Suspensions : पंतप्रधान मोदी यांच्यावर लक्षद्वीपवरून टीका केल्याने मालदीवने ३ मंत्र्यांना केले निलंबित !

भारत सरकारने घेतला होता आक्षेप !

डावीकडून मरियम शिउना, मालशा आणि हसन जिहान

माले (मालदीव) – भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपवरील भेटीवरून त्यांच्यावर टीका करणार्‍या ३ मंत्र्यांना मालदीवने निलंबित केले आहे. मरियम शिउना, मालशा आणि हसन जिहान अशी त्यांची नावे आहेत. मालदीवच्या विरोधी पक्षानेही  त्यांच्यावर टीका केली होती. तसेच माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकारने ‘मंत्र्यांचे  वैयक्तिक मत आहे. मंत्र्यांची मते मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत’, असे निवेदन प्रसारित करत या मंत्र्यांना निलंबित केल्याची माहिती दिली.

सौजन्य एएनआय न्यूज 

मालदीवने निवेदनात म्हटले की, मालदीव सरकारला सामाजिक माध्यमांवर परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्ती यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केलेल्या व्यक्तींची माहिती आहे. ही मते वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकार या मतांचे प्रतिनिधित्व करत नाही. सरकारचे संबंधित अधिकारी अशी अवमानकारक टिप्पणी करणार्‍यांवर कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाहीत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर हा लोकशाही पद्धतीने आणि दायित्वाने व्हायला हवा. अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे द्वेष आणि नकारात्मकता पसरवली जाणार नाही, तसेच मालदीव अन् त्याचे आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्यातील घनिष्ठ संबंधांना बाधा येणार नाही, याचे भान राखले गेले पाहिजे, यावर मालदीवचा विश्‍वास आहे.

मालदीवचे मंत्री आणि नेते यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेली आक्षेपार्ह विधाने !

(म्हणे) ‘भारतापेक्षा आमची पर्यटनासाठीची पायाभूत सुविधा अधिक !’

चीनच्या जिवावर उड्या मारणारा लिंबाएवढा लहानसा बेटांचा देश आपल्याला डोळे वटारून दाखवतो, हे भारताला सहन करण्याच्या पलीकडे आहे. भारताने यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहेत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून तेथील समुद्रकिनार्‍यांवरील छायाचित्रे प्रसारित करत भारतीय नागरिकांना पर्यटनासाठी लक्षद्वीपला जाण्याचे आवाहन केले होते. ‘हे आवाहन अप्रत्यक्ष मालदीव या बेटांच्या देशाच्या पर्यटनाला विरोध करण्यासाठी होते. सहस्रो भारतीय मालदीवला पर्यटनासाठी जात असतात. यामुळे मालदीवला कोट्यवधी रुपयांचा लाभ होतो.’ पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर मालदीवच्या मंत्र्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मालदीवचे मंत्री अब्दुल्ला मोहजुम माजिद यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केली होती. यात म्हटले होते, ‘मालदीवच्या पर्यटनाला लक्ष्य करण्यासाठी मी भारताच्या पर्यटनाला शुभेच्छा देतो; मात्र भारताला आमच्या समुद्रकिनार्‍याच्या पर्यटनातून सडेतोड प्रत्युत्तर मिळेल. आमची पायाभूत सुविधा भारताच्या पायाभूत सुविधांपेक्षा अधिक आहे.’ ही पोस्ट पंतप्रधान मोदी यांना ‘टॅग’ (सूचित) करण्यात आली होती.

मालदीवमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर मासामध्ये झालेल्या निवडणुकीत चीन समर्थक महंमद मुइज्जू यांचा विजय होऊन ते राष्ट्रपती झाल्यापासून मालदीवकडून भारतविरोधी धोरणे राबवण्यात येऊ लागली आहेत.

मालदीवच्या महिला उपमंत्री यांनी पंतप्रधान मोदी यांना म्हटले विदूषक !

डावीकडे मरियम शिउना

मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांचा ‘विदूषक’ आणि ‘इस्रायलची कठपुतळी बाहुली’ असा उल्लेख केला होता. यावर भारत समर्थक असणारे मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नाशीद यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते म्हणाले की, मंत्री मरियम शिउना यांनी चुकीचे शब्द वापरले आहेत. यामुळे मालदीवची सुरक्षा आणि समृद्धी धोक्यात येऊ शकते. राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्या सरकारने अशा टिप्पण्यांपासून दूर रहावे.

आमच्यासारखे समुद्रकिनारे स्वच्छ कसे ठेवणार ? – मालदीवचे नेते जाहित रमीझ

डावीकडे जाहिद रमीझ

मालदीवचे नेते जाहिद रमीझ यांनीही एक पोस्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की, नक्कीच हे एक चांगले पाऊल आहे; मात्र भारताने आमच्याशी स्पर्धा करणे, हा एक भ्रम आहे. ते (भारत) आमच्या प्रमाणे सेवा कशी देणार ? समुद्रकिनारे स्वच्छ कसे ठेवणार ? हॉटेलच्या खोल्यांमध्ये असणारा दुर्गंध हटवणे, हे त्यांच्यासमोर (भारतासमोर) एक मोठे आव्हान असेल’, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली होती.

बहिष्काराच्या आवाहनानंतर मालदीवची शरणागती !

जाहिद रमीझ यांच्या पोस्टनंतर सामाजिक माध्यमांतून भारतियांमध्ये संताप निर्माण झाला असून त्यांनी #BoycottMaldives असा ‘ट्रेंड’ (चर्चेत असलेला विषय) चालू केला आहे. या आवाहनानंतर सहस्रो भारतियांनी मालदीव येथे जाण्याचे आरक्षण रहित केले. यामुळे धास्तावलेल्या मालदीवने शरणागतीच पत्करली आहे.