जिल्हाधिकारी यांच्या पालिका प्रशासनाला सूचना
सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर आणि पाचगणी येथे नेहमीच गर्दी होते. याचा विचार करता तपासणी नाक्यावर ‘फास्ट टॅग’ प्रणालीद्वारे पर्यटकांकडून प्रवासी कर आणि प्रदूषण कर घेण्यास प्रारंभ करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पथकरनाका ठेकेदार उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘सुट्यांच्या वेळी महाबळेश्वर आणि पाचगणी येथील तपासणी नाक्यावर प्रवाशांना थांबवून प्रवासी आणि प्रदूषण कर घेण्यात येतो. त्यामुळे ७ – ८ किलोमीटरपर्यंत लांबचलांब रांगा लागतात. प्रवासी गाडीतच अकडून पडतात. ‘फास्ट टॅग’ प्रणालीमुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, तसेच पर्यटकांचा वेळ वाचून तपासणी नाक्यावरील कर्मचार्यांचाही ताण अल्प होणार आहे. त्यामुळे ‘फास्ट टॅग’विषयी स्थानिक स्तरावर व्यापक प्रसिद्धी देऊन त्वरित उपाययोजना करण्यात यावी.’’