सध्या ‘फिटनेस’विषयी (आरोग्याविषयी) जागरुक असणार्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील काहींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ‘सिक्सपॅक’ची (पिळदार शरीरयष्टीची) त्यांच्यात जबरदस्त ‘क्रेझ’ दिसून आली. अभिनेते हृतिक रोशन, विद्युत् जामवाल आणि संग्राम चौगुले यांच्यासारखे आपले स्वतःचेही दंड मजबूत असावेत, असे त्यांना वाटते. त्याकरता जिममध्ये (आधुनिक व्यायामशाळा) जाणे आणि ‘सिक्सपॅक’ची मायावी स्वप्ने बघणे, हा आजकालच्या तरुण पिढीचा नवा फंडा आहे. शारीरिक सौंदर्य असणे, हा आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा एक भाग आहे; पण तो अविभाज्य घटक आहे, असे नाही.
आधुनिक जिम आणि तिथे केले जाणारे व्यायाम यांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर अनेक लाभ अन् तोटे येतात; पण संयमित आणि योग्य व्यायाम यांसह परिपूर्ण आहार घेतला, तरच आपण जिमचा लाभ करून घेऊ शकतो, यात अजिबात शंका नाही .
१. आयुर्वेदाचा दृष्टीकोन
मानवी शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या ७ धातूंपासून बनले आहे. रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थी, अशा क्रमाने एकेका धातूचे आधीच्या धातूपासून पोषण होते. आपण लक्ष देऊन पाहिले, तर आधुनिक व्यायाम पद्धतीत फक्त मांस धातू पुष्ट करण्याकडे कल दिसतो.
शरिराच्या आतील अवयवांना आवरण म्हणून आणि वंगण म्हणून मेद म्हणजेच चरबीची योग्य मात्रा शरिरात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘झिरो फॅट’ (चरबीमुक्त) ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. एकच धातू (मांस) वाढवण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न होत असतील आणि केवळ मांस पुष्ट दिसेल, असा व्यायाम होत असेल, तर पुढील मांसाच्या पुढचे धातू कमकुवत होतात. म्हणून हाडांची दुखणी, शुक्रधातू आणि प्रजनन यांच्याशी संबंधित आजार अशा व्यक्तींमध्ये तीव्रतेने व्यक्त होतात, असे दिसते; जे पुढे गंभीर रूप धारण करतात.
२. ‘सूर्यनमस्कार’ हा परिपूर्ण व्यायाम !
तालमीत पैलवान करतात तो व्यायाम आणि त्यांचा आहार यांचा अभ्यास केला, तर भारतीय व्यायाम पद्धत सर्वांत आदर्श आहे, असे लक्षात येते. माझ्या संपर्कात आलेल्या जीम आणि तालीम येथे जाणार्या मुलांमध्ये बरेच भेद दिसून येतात. तालमीत नियमित जाणारी मुले अधिक उत्साही आणि निरोगी असतात. भारतीय संस्कृतीत सांगितलेला ‘सूर्यनमस्कार’ हा परिपूर्ण व्यायाम आहे. शास्त्रोक्त सूर्यनमस्काराने शरिराचे काहीही उपकरण न वापरता शारीरिक सौंदर्य टिकून रहाते. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करत असाल, तर तो प्रमाणाबाहेर अधिक ताण घेऊन करू नका. ‘शरिराला किती कट्स पडतात (शरिराला पीळ दिसतात)’, यापेक्षा प्रकृती स्थिर आहे का ? याचाही अभ्यास करा. नियमित व्यायाम करणार्यांनी नेहमीच्या आहारातही योग्य ते संतुलन ठेवले, तर निश्चित लाभ होतो. त्यामुळे भारतीय व्यायाम पद्धत उत्तम आहे.
– डॉ. भोरकर, नॅचरोथेरपिस्ट, न्यूट्रीशियनिस्ट अँड डायटिशन
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)