अवकाशातून शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार !
मुंबई – येत्या ५ वर्षांत ५० उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या आम्ही सिद्धतेत आहोत. पृथ्वीच्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये हे उपग्रह स्थापित केले जाणार आहेत, ज्यात सैन्याच्या हालचाली आणि सहस्रो किलोमीटरच्या क्षेत्राची छायाचित्रे गोळा करण्याची क्षमता असेल. अंतराळयान देशाच्या सीमा आणि शेजारच्या भागांवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. आम्ही याला अत्यंत महत्त्व देऊन काम करत आहोत; कारण कोणत्याही राष्ट्राची शक्ती ही ‘त्याच्या आजूबाजूला काय घडत आहे ?’, हे समजून घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ यांनी येथे दिली. ते येथील ‘मुंबई आयआयटी’च्या वार्षिक विज्ञान महोत्सवात बोलत होते.
इस्रो प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ म्हणाले की, आगामी काळात हवामान खूप महत्त्वाचे असेल. वायू प्रदूषण, हरितगृह वायू, महासागरांचे वर्तन, माती आणि किरणोत्सर्ग यांसारख्या घटकांचा अभ्यास करून भारत या क्षेत्रांमध्ये योगदान देऊ इच्छित आहे. आम्ही यासाठी एक उपग्रह बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि आम्हाला जी-२० देशांनी भारतात यावे आणि यासाठी उपकरणे आणि अन्य योगदान द्यावे, अशी आमची इच्छा आहे. आम्ही हा उपग्रह २ वर्षांत प्रक्षेपित करू आणि हे जगासाठी भारताचे योगदान असेल. यातून मिळालेली माहिती संपूर्ण जगासाठी उपलब्ध व्हावी, जेणेकरून अन्य देशक त्यांच्या संशोधनात त्याचा वापर करू शकतील, अशी आमची इच्छा आहे.
६ जानेवारीला दुपारी ४ वाजता लॅग्रेंज पॉईंटला पोचेल आदित्य-एल १ उपग्रह !
(‘लँग्रेज पाईंट’ म्हणजे या बिंदूवरून सूर्य कोणत्याही अडथळ्याविना सलग दृष्टीस पडतो.)
देशातील पहिल्या सौर मोहिमेविषयी डॉ. एस्. सोमनाथ म्हणाले की, ‘आदित्य-एल् १’ हा उपग्रह ६ जानेवारीला दुपारी ४ वाजता लँग्रेज पॉईंटवर पोचणार आहे. ‘आदित्य एल् १’च्या सर्व उपकरणांची चाचणी घेण्यात आली असून ते चांगले काम करत आहेत.
श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून २ सप्टेंबर २०२३ या दिवशी ‘आदित्य एल् १’चे प्रक्षेपण करण्यात आले. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम प्रारंभ करण्यात आली आहे. लँग्रेज पॉईंट पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर आहे.
सोमनाथ म्हणाले की, लँग्रेज पॉईंट हा एक असा प्रदेश आहे जिथे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण नाहीसे होते. आदित्य एल् १ येथे पोचल्यावर सूर्याचा अभ्यास करू शकेल. आम्हाला आशा आहे की, ‘सोलर कोरोना’ (सूर्याच्या गरम बाह्य वातावरणाला सोलर कोरोना’ म्हणतात) ‘मास इजेक्शन’ (सूर्याच्या पृष्ठभागावरील सर्वांत मोठ्या स्फोटांपैकी एक) आणि त्यांचा आपल्या हवामानावर होणारा परिणाम यांचा काय संबंध आहे, हे आम्ही शोधू शकू.