|
नवी देहली – देहलीतील चाणक्यपुरी येथे असलेल्या इस्रायली दूतावासाजवळ २६ डिसेंबरच्या सायंकाळी स्फोट झाला. अल्प तीव्रतेच्या स्फोटाच्या संदर्भात पोलिसांना सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळाले असून त्यात २ संशयित दिसत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुसरीकडे इस्रायलच्या राष्ट्रीय संरक्षण परिषदेने भारतात रहाणार्या इस्रायली नागरिकांसाठी प्रवासासाठीच्या सूचना प्रसारित केल्या आहेत. यांतर्गत त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार देहली पोलिसांना घटनास्थळावरून इस्रायली ध्वजात गुंडाळलेले पत्र सापडले. यात ‘इस्रायलचे गाझावरील आक्रमण’ आणि ‘सूड’ असे लिहिले होते. या पत्रात इस्रायलच्या गाझावरील कारवाईवर टीका करण्यात आली आहे.
२. देहली पोलिसांनी या भागात कोणतीही स्फोटके सापडली नसल्याचे सांगितले आहे. त्यांना २६ डिसेंबरला स्फोट झाल्यानंतर दूरभाषवरून याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी उपस्थित झाले.
३. इस्रायली दूतावासाचे प्रवक्ते गाय नीर यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास दूतावासाजवळ स्फोट झाला. आमचे कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
४. वर्ष २०२१ मध्ये याच दूतावासाबाहेर अल्प तीव्रतेचा स्फोट झाला होता. यामध्ये तीन गाड्यांची हानी झाली होती. त्या वेळी इस्रायलने इराणवर कटाचा आरोप केला होता.