China AI Weapons: शत्रूसैन्याला झोप आणण्यासाठी चीन सिद्ध करत आहे ‘एआय’च्या साहाय्याने शस्त्रे !

भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधात करणार वापर !

‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) !

बीजिंग (चीन) – चिनी सैन्य युद्धाच्या मैदानात न उतरता युद्ध लढण्याच्या सिद्धतेत आहे. भारत, अमेरिका अथवा ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांशी दोन हात करण्यासाठी चीन ‘बायोवेपन्स’ आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांचे साहाय्य घेत आहे. यासाठी चिनी सैन्य ‘पी.एल्.ए.’ने ‘ब्रेन वॉरफेअर’ (मेंदू युद्ध तंत्रज्ञान) नावाचा एक विभागच स्थापित केला आहे. यामध्ये अशा शस्त्रांची निर्मिती केली जात आहे, ज्या माध्यमातून शत्रू सैनिकांच्या मनावर नियंत्रण ठेवून त्याला निद्रिस्त ठेवता येणार आहे.

अशा प्रकारे कार्य करणार चीनची अत्याधुनिक शस्त्रे !

  • ‘ब्रेन वॉरफेअर युनिट’ चीनच्या मनोवैज्ञानिक युद्ध धोरणाचा एक भाग !
  • शत्रूवर मन-नियंत्रित शस्त्रांनी आक्रमण केले जाईल.
  • काही शस्त्रांमध्ये शत्रूला झोपवण्याची क्षमता !
  • शस्त्रे ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी’चा (अणूचुंबकीय ऊर्जेचा) करणार वापर !
  • शस्त्रे ‘सॉफ्ट किल रेडिओ लहरी’ सोडतील. यामुळे शत्रूदेशाचे सैनिक झोपायला लागतील.
  • चिनी सैनिकांवर यांचा परिणाम होऊ नये, यासाठी ‘अँटी स्लीप ग्लासेस’चा होणार वापर; यावरही संशोधन चालू !

शत्रू सैनिकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचीही सिद्धता !

चिनी सैन्य एक असे यंत्रही बनवत आहे, जे मेंदू आणि बाह्य तंत्रज्ञान यांना थेट जोडू शकते. यामुळे चीनला कार्ये नियंत्रित करण्याची क्षमता मिळेल. सोप्या शब्दांत या यंत्राद्वारे शत्रू सैनिकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवता येणार आहे. एकूणच ही प्रगत ‘माइंड कंट्रोल शस्त्रे’ चिनी सैनिकांच्या मनावर नियंत्रण ठेवतील आणि शत्रू सैनिकांच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतील.

संपादकीय भूमिका

युद्धलालसा बाळगणार्‍या कावेबाज चीनपासून स्वत:चा बचाव करण्यासह आता भारताने आक्रमक भूमिका घेणे हितावह ठरणार आहे !