शिक्षा ठोठावताच काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू !

काँग्रेसचे नेते सुनील केदार

नागपूर – येथील नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावताच सुनील केदार यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखून अस्वस्थ वाटू लागले. त्यांना शासकीय रुग्णालयात रात्री विलंबाने भरती करण्यात आले. न्यायालयातून कारागृहात जाण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तज्ञ आधुनिक वैद्यांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

२ वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने केदार यांची आमदारकी रहित होऊ शकते. त्यांना उच्च न्यायालयातून तातडीने जामीन मिळाला, तरच दिलासा मिळेल. जामिनासाठी ते सुटीकालीन न्यायाधिशांकडे जाऊ शकतात, असे विधीमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले. केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायालयात आहे.