चैतन्यमय वाणी आणि प्रीती या गुणांमुळे अनोळखी व्यक्तीलाही साधना सांगून आपलेसे करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्री. विनायक शानभाग

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री. देवा यांच्याशी अनोळखी असूनही अनेक वर्षांपासून ओळखत असल्याप्रमाणे बोलणे आणि त्यांना आपलेसे करून घेणे

‘ऑगस्ट २०२३ मध्ये सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मुन्नार, केरळ येथे गेल्या होत्या. तेथे एका हितचिंतकाने आम्हाला रहाण्यासाठी त्यांचे घर दिले होते. त्यांच्याकडे ‘देवा’ नावाचा स्वयंपाकी होता. तो बंगाली होता; पण अनेक वर्षे मुंबईत काम केल्याने त्याला मराठी बोलता येत असे. ‘नवीन ठिकाणी गेल्यावर आणि त्यात अनोळखी व्यक्तीशी काय बोलायचे ?’,

असा विचार मी करत होतो; मात्र श्रीचित्‌शक्ति सौ. गाडगीळ श्री. देवा यांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याप्रमाणे त्यांच्याशी बोलत होत्या. आम्ही त्या ठिकाणी ४ दिवस राहिलो. त्या चार दिवसांतच काकूंनी श्री. देवा यांना आपलेसे करून घेतले. त्यांना साधना सांगितली आणि नामजप करायला सांगितला. श्री. देवा यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.

२. गुरूंच्या वाणीत चैतन्य आणि प्रीती असल्याने त्यांनी सांगितल्यावर समोरची व्यक्ती साधना करू लागणे

संतांच्या सत्संगाने श्री. देवा यांच्यामध्ये केवळ ४ दिवसांतच झालेला पालट पाहून ‘गुरूंची सर्व जिवांप्रती समान प्रीती असते’, हे माझ्या लक्षात आले. जसे आकाशातील ढग व्यक्ती, प्रदेश, समाज आणि देश, असा भेद न करता पाऊस पाडतात किंवा वृक्ष सर्वांना समान छाया देतात, तसेच गुरु सर्वांवर समान प्रीती करतात. गुरूंच्या वाणीत चैतन्य आणि प्रीती असल्याने त्यांनी सांगितल्यावर समोरची व्यक्ती साधना करू लागते.

या प्रसंगातून ‘गुरु कोणत्याही जिवाचे पद, त्याची नोकरी आदी पहात नाहीत, तर ते केवळ त्या जिवातील चैतन्याकडे पहातात आणि इतरांनाही प्रत्येकातील चैतन्याकडेच पहायला शिकवतात’, असे मला शिकायला मिळाले.’

– श्री. विनायक शानभाग, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) कांचीपूरम्, तमिळनाडू. (४.१२.२०२३)