अटक टाळण्यासाठी लाच घेणार्‍या साहाय्यक पोलीस फौजदारावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – दखलपात्र गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी ५० सहस्र रुपयांची मागणी करून १० सहस्र रुपये स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून साहाय्यक पोलीस फौजदाराला रंगेहाथ पकडले. राजेंद्र दगडू गवारे (वय ५३ वर्षे) असे या साहाय्यक पोलीस फौजदाराचे नाव असून सध्या ते शिरूर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत.

शिरूरमधील ६५ वर्षांचे तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा नोंद होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी गवारे यांनी ५० सहस्र रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तडजोडीअंती १० सहस्र रुपये स्वीकारण्यास गवारे यांनी सहमती दर्शवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तहसील कचेरी कार्यालयासमोरील ‘हॉटेल मित्रधन’मध्ये सापळा रचला. तक्रारदारांकडून १० सहस्र रुपये स्वीकारतांना गवारे यांना पकडण्यात आले.

संपादकीय भूमिका

असे लाचखोर पोलीस कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडवण्यास कारणीभूत आहेत. अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !