सनातनचे सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. कमलेश आठवले यांची कुटुंबियांसह रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

रामनाथी (गोवा) : सनातनचे सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले यांचे सुपुत्र आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पुतणे डॉ. कमलेश आठवले यांनी त्यांच्या कुटुंबियांसह २० डिसेंबर २०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्वराली, पुत्र कु. अर्जुन आणि कु. सोहम्, तसेच मेहुणे श्री. अमित राजाध्यक्ष यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र, धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती सनातनचे साधक श्री. भूषण कुलकर्णी यांनी सांगितली. सर्वांनी संपूर्ण कार्य अत्यंत जिज्ञासेने आणि श्रद्धेने जाणून घेतले. आश्रमातील स्वच्छता, व्यवस्थापन आणि साधकांचा त्याग पाहून त्यांनी कौतुक केले.

डॉ. कमलेश आठवले हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ असून गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत. नॉर्थ कॅरोलिना राज्यात असलेल्या डरहॅम शहरातील ड्यूक विद्यापिठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सनातनच्या आयुर्वेदाशी संबंधित काही ग्रंथांचे संकलनही त्यांनी केले आहे. त्यांचे मेहुणे श्री. अमित राजाध्यक्ष हे बेंगळुरू येथे कार्यरत आहेत.

डॉ. कमलेश आणि सौ. स्वराली आठवले यांचे वेगळेपण !

अमेरिकेसारख्या रज-तम प्रधान वातावरणात राहूनही आठवले उभयता त्यांच्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

१. दोन्ही मुलांना मातृभाषा मराठीची माहिती मिळावी, मराठीत लिहिता-वाचता यावे, यासाठी त्यांनी तेथील मराठी प्रशिक्षण देण्याच्या वर्गात दोघांना घातले. मोठा मुलगा सलग ५ वर्षे मराठीच्या साप्ताहिक वर्गांना जात असे. लहान मुलगा अजूनही मराठीचे प्रशिक्षण घेत आहे.
२. मुलांना तबला आणि शास्त्रीय संगीत यांचे वर्ग लावले आहेत.
३. हिंदु संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी त्यांना नियमित तेथील भारतीय बालसंस्कारवर्गालाही ते घेऊन जातात.
४. मुलांना देवता आणि उपासना यांची ओळख व्हावी, यासाठी ते प्रतिवर्षी भाद्रपद मासात गणेशोत्सव आवर्जून साजरा करतात.