महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ५ वी आणि ८ वी या इयत्तांसाठी पुन्हा वार्षिक लेखी अन् तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आता मतमतांतरे आणि चर्चा चालू झाल्या आहेत. एक काळ असा होता की, दहावीचा शैक्षणिक मंडळाचा (बोर्डाचा) निकाल, ‘बोर्डा’त येणे’, ‘बोर्डात येणार्या शाळा’ या गोष्टींना पुष्कळ महत्त्व होते. त्या वेळी ९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या आजच्यासारखी भरमसाठ नव्हती; त्यामुळे हे निकाल लावणेही तुलनेत सोपे होते. त्या वेळी पहिल्या ५० जणांची नावे वृत्तपत्रात शाळेच्या नावासहित प्रसिद्ध होत. गेल्या काही वर्षांत ही पद्धत बंद झाली. विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळू लागले. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या, हुशारी, शिकवणीवर्गांत घालणे, स्पर्धा वाढल्याने उच्चशिक्षित पालकांची वाढलेली सजगता, घरी दोनच मुले असल्याने त्यांच्याकडे अधिक लक्ष, हा सर्व भाग वाढला, तरी त्याचसमवेत परीक्षा देण्याची पालटलेली पद्धत (पॅटर्न) हीसुद्धा तितकीच कारणीभूत ठरली. पर्यायी प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवणेही शक्य झाले. गेल्या काही वर्षांपासून मुलांच्या वार्षिक परीक्षेत गुणांकन न करता केवळ श्रेणी देण्याची, म्हणजे अप्रत्यक्षरित्या दहावीपर्यंत वरच्या वर्गात ‘ढकलण्या’ची पद्धत चालू करण्यात आली. ‘तिमाही, सहामाही, वार्षिक परीक्षा यांचा मुलांना ‘ताण’ येतो’, असे म्हटले गेले. कित्येकदा शिक्षक आणि पालकच निरागस मुलांमध्ये हा ताण निर्माण करतात. ‘मुलांमध्ये गुणांची स्पर्धा निर्माण होणे, हे लहान वयात चांगले नाही,’ म्हणून परीक्षांचे गुणांकन बंद करून सरसकट श्रेणीचा पर्याय हा हुशार मुलांवर खचितच अन्याय करणारा नव्हे का ? पालकांची अपेक्षा, मुलांची क्षमता आणि कल लक्षात न घेणे, भ्रमणभाषचा वापर, मुलांचे अयोग्य नियोजन, इंग्रजी माध्यमाचा आग्रह, मुलांना छंद किंवा कला वर्ग यांची केलेली अपरिहार्यता आदी अनेक कारणे लक्षात न घेता केवळ ‘ताण येतो’, म्हणून गुणांकन बंद करण्यात आले. मुलांना ताण येण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाय करण्यापेक्षा हा उपाय योजण्यात आला. त्यामुळे काही लाभ झालेले असूही शकतात; परंतु काही तोटेही झाले. गुणांकनामुळे मुलांमध्ये एका निकोप स्पर्धेला वाव रहातो; उलट श्रेणीपद्धतीमुळे वरच्या वर्गात जाणार, याची निश्चिती असल्याने मुलांमध्ये शिथिलता येऊ शकते आणि अभ्यास अल्प झाल्याने थेट दहावीमध्ये वार्षिक परीक्षा कठीण जाते. मुलांचा अभ्यास कच्चा रहातो. आता ५ वी आणि ८ वी या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा चालू करण्याच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार आहे; परंतु याविषयी शिक्षक अन् पालक यांनाच अडचणी वाटत आहेत. त्या अडचणींवर योग्य उपाय काढून परीक्षांचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाविषयी ज्या शिक्षकांना शंका असतील, त्यांच्या शंकानिरसनासाठी आणि परीक्षाव्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.
विद्यार्थी घडवणे महत्त्वाचे !
दहावीत शाळेचा निकाल चांगला लागला पाहिजे; म्हणून सध्या काही खासगी शाळांतून ९ वीत अधिक विद्यार्थांना अनुत्तीर्ण केले जाते; आता ‘हा प्रकार ८ वीतच चालू होईल’, असे काहींना वाटतेे. श्रेणी देण्यामागे मुलांचा ताण आणि स्पर्धेचे वातावरण न्यून करणे, हा हेतू होता. हा हेतू किती साध्य झाला ? हे ठाऊक नाही; पण उलट यामुळे ‘मुलांची कष्ट घेण्याची आणि ते करवून घेण्याची प्रवृत्ती न्यून झाली’, असे मात्र वाटते. वरील इयत्तांच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अट घालून पुढच्या वर्गात घेतले जाणार आहे. या पुनर्परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच अधिक आला आहे; कारण ‘परीक्षेनंतर सुटी लागल्यावर अनुत्तीर्ण मुलांचा अभ्यास कधी घेणार ?’, असा प्रश्न त्यांना पडला आहे. वर्षभर जे अभ्यासात कच्चे राहिले, त्यांची पुढील वर्षी शाळा चालू झाल्यावर काही दिवसांत मागील अभ्यासक्रमाची परीक्षा घेणे शिक्षकांना कठीण वाटत आहे. या सर्व अडचणींचे उत्तर ‘पहिलीपासून आणि शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्याचा किमान अभ्यास होण्यासाठी पालक अन् शिक्षक यांनी प्रयत्नरत रहाणे’, हेच आहे. खरेतर ही परीक्षा केवळ ३ विषयांसाठी ५० किंवा ६० गुणांची आहे. तरीही काही शिक्षकांचा त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. त्यांचीही ‘विद्यार्थी योग्य रितीने घडावे’, यासाठी प्रथमपासून कष्ट घेण्याची सिद्धता नाही’, असेच यामुळे खेदाने म्हणावेसे वाटते. ५० वर्षांपूर्वीपर्यंत शिक्षक ही समाजातील एक आदर्श व्यक्ती समजली जात असे. विद्यार्थी ‘या शिक्षकांमुळे मी घडलो’, असे आवर्जून सांगत. आता असे शिक्षक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नसतील. शिक्षकही ‘नोकरदार’ अधिक आणि पालकही अधिक ‘व्यावहारिक’ झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची मात्र हानी होत आहे.
विद्यार्थ्यांचे आदर्श मूल्यमापन कसे झाले पाहिजे ? गुरुकुलपद्धतीप्रमाणे त्याचा कल लक्षात घेऊन त्यात त्याला प्रवीण केले गेले पाहिजे. आता सरसकट सर्वांना एकच एक अभ्यासक्रम असतो आणि तोही मूळ इतिहासाशी विसंगत, त्याच्या मातीशी नाळ तोडणारा, त्याची भाषा दूषित करणारा किंवा त्याच्या संस्कृतीपासून दूर नेणारा…! (आता या स्थितीत काही प्रमाणात पालटही होत आहे, हे स्वागतार्ह आहे.) विद्यार्थी ही देशाची उद्याची पिढी आहे. हे घडण्याचे, उमेदीचे वय असल्याने या वयात शिस्त आणि कष्ट यांना पर्याय नाही; पालकांनीही पाल्याला या वयात लाडावणे योग्य ठरणार नाही. सार्या जगाची कायदा आणि सुव्यवस्था जिथे शिक्षेच्या भीतीने चालते, तिथेे ‘शिस्तीची छडी लागल्याविना विद्याही घमघम येत नाही’, हे पालकांनीही लक्षात घेतले पाहिजे. ‘संस्कारक्षम विद्या ग्रहण करणारा ‘विद्यार्थी घडवायचा’ असून परीक्षा देणारा परीक्षार्थी नाही’, हे शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शिक्षणसंस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि पालक यांनी प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. ‘विद्यार्थ्यांना घडवणे’ आणि ‘कसे घडवायचे’ ही दिशा एकदा स्पष्ट असेल, तर परीक्षांचा ताण कुणालाच रहाणार नाही, नाही का ?
‘विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवणे’, ही दिशा स्पष्ट असेल, तर परीक्षेचा ताण कुणालाच रहाणार नाही ! |