मराठी भाषा अभिजात करण्‍यासाठी कुणाच्‍या प्रमाणपत्राची आवश्‍यकता का भासते ? – महेश एलकुंचवार, ज्‍येष्‍ठ नाटककार

पुणे येथील ‘वाङ्‌मयीन युगांतर आणि श्री.पु. भागवत’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा !

श्री. महेश एलकुंचवार

पुणे – मराठी भाषेचा अभिजात दर्जा, हा सध्‍याचा ऐरणीवरचा प्रश्‍न झाला आहे; पण मराठी भाषा अभिजात करण्‍यासाठी कुणाच्‍या प्रमाणपत्राची आवश्‍यकता का भासते ? हा खरा प्रश्‍न आहे. ती अभिजात करण्‍याचे दायित्‍व समाज म्‍हणून आपले आहे, असे मत ज्‍येष्‍ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे बोलतांना व्‍यक्‍त केले. मराठी साहित्‍य जगतातील प्रतिभाशाली संपादक श्री.पु. भागवत यांचे वर्ष २०२३ हे जन्‍मशताब्‍दी वर्ष आहे. यानिमित्ताने राजहंस प्रकाशनाच्‍या वतीने  श्री.पु. भागवत यांच्‍या संपादकीय कर्तृत्‍वाचा वेध घेणार्‍या ‘वाङ्‌मयीन युगांतर आणि श्री.पु. भागवत’ या ग्रंथाचे प्रकाशन एलकुंचवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या वेळी ते बोलत होते.

या वेळी श्री.पु. भागवत यांचे चिरंजीव आणि ‘मौज प्रकाशन गृहा’चे अशोक भागवत, राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर आणि ज्‍येष्‍ठ समीक्षक आणि ‘वाङ्‌मयीन युगांतर आणि श्री.पु. भागवत’ या ग्रंथाचे संपादक डॉ. सुधीर रसाळ आदी उपस्‍थित होते. एलकुंचवार पुढे म्‍हणाले की, आपल्‍याकडे अनेक संस्‍था आणि चळवळी यांचे आयुर्मान अवघे १० वर्षांचे असते. ‘सत्‍यकथा’ ही मराठी साहित्‍यातील मोठी वाङ्‌मयीन घडामोड होती; पण आजच्‍या पिढीला कालच्‍या या सांस्‍कृतिक घडामोडींविषयी आस्‍थाच नाही. याउलट परदेशात अनेक चळवळी आणि संस्‍था शतकानुशतके चालू रहातात; कारण तिथल्‍या सर्जनशील पिढीचे अग्रक्रम समान असतात.