श्रीरामाच्या नित्यपूजेसाठी नाशिक येथील काळाराम मंदिराचे पूजाविधान उपलब्ध ! – महंत सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थान, नाशिक

महंत सुधीरदासजी महाराज

नाशिक – येत्या जानेवारी महिन्यात अयोध्या येथे श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या निमित्ताने नाशिकमधील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात काळारामाच्या नित्यपूजेसाठी वापरले जाणारे आणि पुजारी परिवाराच्या वतीने २७ पिढ्यांनी मौखिक आणि हस्तलिखित परंपरेने जपलेले पूजाविधान अयोध्येच्या श्रीराम मंदिर न्यासाला उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती श्री काळाराम मंदिर संस्थानचे महंत आणि पुजारी परिवारातील महंत सुधीरदासजी महाराज यांनी दिली आहे. मंदिरातील पूजाविधानातील जवळपास ५० ते ६० टक्के पूजाविधान हे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पूजाविधानात समाविष्ट केले जाणार आहे.

त्रिकाल अर्चन पूजाविधान म्हणजे काय ? 

श्री काळारामाच्या त्रिकाल अर्चन पूजाविधानात ‘श्रीं’ची षोडशोपचार आणि राजोपचार यांद्वारे पूजा होते. पुरुषसूक्तातील १६ ऋचा या ‘श्रीं’च्या ठायी असणार्‍या १६ कला आहेत, असे कल्पून श्रींच्या चैतन्यशक्तीस आव्हान केले जाते. यातून प्रकटणारी ‘आल्हादिनी शक्ती’ ही भक्तांना बल प्रदान करते, अशी श्रद्धा आहे.