पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर काकर यांचा आरोप !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणामध्ये जम्मू-काश्मीरचे सूत्र सर्वांत महत्त्वाचे आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरविषयीच्या कलम ३७० संदर्भात दिलेला निर्णय कायद्यावर नाही, तर राजकारणावर आधारित आहे, असा आरोप पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर-उल्-हक काकर यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने ११ डिसेंबर या दिवशी कलम ३७० रहित करण्याचा सरकारचा निर्णय कायम ठेवला. त्यावर काकर पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेत बोलत होते.
सौजन्य जीटीवि नेटवर्क
पाकिस्तान भारतासमवेत चांगले संबंध ठेवू इच्छितो !
काकर पुढे म्हणाले की, कश्मीर पाकिस्तानच्या नसांमध्ये आहे. पाकिस्तान काश्मीरविना अपूर्ण आहे. ‘काश्मिरी नागरिकांना स्वतःविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे’, याचे संपूर्ण पाकिस्तान समर्थन करतो. संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरचा प्रश्न सर्वांत जुना न सुटलेला प्रश्न आहे. पाकिस्तान शेजारी देश असल्याने भारताशी चांगले संबंध ठेवू इच्छितो; मात्र वर्ष २०१९ मध्ये भारताने काश्मीरविषयी एकतर्फी निर्णय घेतल्याने वातावरण बिघडले आहे. ते पूर्वपदावर आणण्याचे दायित्व केवळ भारताचेच आहे.
संपादकीय भूमिकाभारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्याचा मुळात पाकला कोणताही अधिकार नाही ! पाकिस्तानच्या न्यायालयांकडून तेथील पीडित हिंदूंवर किती अन्याय केला जातो ?, हे जगाला ठाऊक आहे ! भारताच्या न्यायालयावर आरोप करण्यापेक्षा पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे ! |