पाणीवाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटकशी चर्चा करण्यास सिद्ध ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – कोयना धरणामध्ये १४ टी.एम्.सी. पाणी अल्प आहे. आम्ही नदी कोरडी पडू देणार नाही. सीमाविषयक प्रश्न असला, तरी पाण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच कर्नाटकला सहकार्य करतो; परंतु आमच्या हक्काच्या पाण्यासाठी त्या राज्याची भूमिका सहकार्याची नसते. पाणीवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी कर्नाटक सरकारशी कायमस्वरूपी करार करण्याची आमची सिद्धता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी तेथील काँग्रेस सरकारशी चर्चा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केले.

आमदार जयंत पाटील (शरद पवार गट) यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. कोयना धरणातील पाणी वाटपाविषयी सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांमध्ये जलसंपदामंत्र्यांनी समन्वय घडवावा. ‘नदीपात्र कोरडे होऊ नये, यासाठी आवश्यकता वाटल्यास कोकणच्या वीजनिर्मितीसाठीचे पाणी अल्प करा’, अशी मागणी या वेळी जयंत पाटील यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनीही ‘लवादाची अडचण येणार नाही’, असे मत व्यक्त केले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वरील आवाहन केले.