सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टकली. या वेळी ३०० कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळून आली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सातारा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वात शिवतीर्थावर (पोवई नाका) आंदोलन करण्यात आले. या वेळी खासदार साहू यांच्या पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आले. एकाच वेळी जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, कोरेगाव आणि वाई या ठिकाणी हे निषेध आंदोलन करण्यात आले.
या वेळी प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देतांना भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, ‘‘६ डिसेंबर या दिवशी आयकर विभागाने खासदार साहू यांच्या झारखंड आणि ओडिशातील १० मद्यनिर्मिती आस्थापनांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३०० कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम मिळून आली. ही रक्कम एवढी मोठी होती की, आयकर विभागाला नोटा मोजण्यासाठी ४० हून अधिक यंत्रे मागवावी लागली. साहू हे ३ वेळा काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राहिले आहेत.