सद्गुरु स्वाती खाडये यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे साधकांनी शरीर आणि डोळे यांवरील वाईट शक्तीचे आवरण नियमितपणे काढल्यावर त्यांना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती !

२०.१०.२०२२ ते २१.११.२०२२ या कालावधीत सद्गुरु स्वाती खाडये यांनी पुणे, कोल्हापूर, सांगली आणि गोवा येथील साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगामध्ये त्यांनी साधकांना ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धतीद्वारे नामजप कसा शोधायचा ?’, हे शिकवले. त्यासह स्वतःभोवतालचे वाईट शक्तीचे आवरण काढण्याच्या ‘मनोरा (टॉवर) पद्धत’, ‘तळहाताच्या मुद्रेने आवरण काढणे’ आणि ‘डोळ्यांवरील आवरण काढणे’, या उपायपद्धतींविषयी मार्गदर्शन केले. साधकांना या सत्संगाचा पुष्कळ लाभ झाला. सत्संगामध्ये शिकवल्याप्रमाणे आवरण काढल्यानंतर अल्पावधीतच साधकांचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, वास्तू इत्यादींमधील त्रास न्यून होत असल्याचे लक्षात आले. आवरण काढल्यानंतर साधकांना झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेला जप १ मास केल्यावर मूतखडा आपोआप बाहेर पडणे आणि २० वर्षांपासून होणारा धाप लागण्याचा त्रास उणावणे

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

‘मला मागील २० वर्षांपासून श्वास घेतांना धाप लागत असे. मागील ६ मासांपासून मूतखड्याचा त्रास उद्भवल्यामुळे मला पोटदुखी, थंडी-ताप, हे विकारही होऊ लागले. त्यावर सद्गुरु सत्यवान कदम यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा जप १ मास करायला सांगितला. हा जप केल्यामुळे माझा मूतखडा आपोआप बाहेर पडला. त्यामुळे मला होणारा थंडी-ताप आणि पोटदुखीचा त्रास अत्यल्प झाला, तसेच धाप लागण्याचा त्रासही उणावला.’ – एक साधिका

सद्गुरु स्वाती खाडये आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी मार्गदर्शन करत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. ‘सत्संगाला आल्यानंतर काही साधकांच्या चेहर्‍यावर वाईट शक्तीचे त्रासदायक आवरण दिसत होते आणि काही साधक पुष्कळ विचारांमध्ये होते. सत्संग चालू झाल्यावर हळूहळू साधकांवरील वाईट शक्तीचे त्रासदायक आवरण न्यून होऊ लागले. सत्संगानंतर काही साधकांच्या चेहर्‍यात पुष्कळ पालट झाला. सर्व साधकांची सकारात्मकता वाढली.

२. सभागृहात सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग चालू असतांना सर्व साधकांना ‘वातावरणातील हलकेपणा वाढणे, सभागृहातील प्रकाश वाढणे’, अशा अनुभूती आल्या.’

– (पू.) सौ. मनीषा महेश पाठक, पुणे (१३.१.२०२३)


१. पुणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती

१ अ. सौ. राधा सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे.

१ अ १. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा जप करतांना छातीवर दाब जाणवू लागणे, आसंदीवरून खाली फेकले जाणे आणि ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे जाणवणे : ‘सद्गुरु स्वातीताईंनी सत्संगात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा जप ५ मिनिटे करायला सांगितला. त्याप्रमाणे नामजप करायला आरंभ केल्यावर २ – ३ मिनिटांनी मला माझ्या छातीवर दाब जाणवू लागला. मी आसंदीवर बसलेले असतांना अकस्मात् आसंदीवरून खाली फेकले गेले. असा त्रास मला पूर्वी होत होता; पण मागील पुष्कळ दिवसांत तसा त्रास झाला नव्हता. हा जप करत असतांना ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे मला जाणवले आणि त्यानंतर मला चांगले वाटू लागले. त्या वेळी मला प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) नामातील शक्ती अनुभवता आली.

१ अ २. ‘माझ्यावरील वाईट शक्तीचे आवरण हळूहळू न्यून होत आहे’, असे मला जाणवू लागले.

१ अ ३. आता ‘सत्संगात सांगितल्याप्रमाणे उपाय करायला लागल्यापासून माझ्या शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण निघून जात आहे’, असे मला जाणवते.’

१ आ. सौ. हेमलता म्हात्रे, चिंचवड, पुणे.

१ आ १. सत्संगात सांगितल्याप्रमाणे डोळ्यांवरील वाईट शक्तीचे आवरण काढल्यामुळे डोळ्यांचे त्रास न्यून होणे : ‘नोव्हेंबर २०२२ मध्ये सद्गुरु स्वातीताईंनी घेतलेल्या सत्संगात मला ‘डोळ्यांवरील आवरण कसे काढायचे ?’, हे शिकायला मिळाले. घरी आल्यानंतर मी तसे उपाय करण्याचा प्रयत्न केला. केवळ २ वेळा प्रयत्न केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी माझ्या डोळ्यांचा जडपणा न्यून होऊन मला हलकेपणा जाणवू लागला. मला वाचतांना अस्पष्ट दिसायचे. हे उपाय नियमित केल्यामुळे आता मला स्पष्ट दिसते. त्यानंतर माझा डोळ्यांचा त्रास पुन्हा उद्भवला नाही.’

१ इ. श्री. शिवानंद नागशेट्टी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), पिंपरी, पुणे.

१. ‘सत्संगाच्या स्थळी मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

२. सत्संगात मार्गदर्शन केल्याप्रमाणे उपाय चालू केल्यापासून माझी गुडघेदुखी न्यून झाली. आता माझ्या शरिरातील थकवा आणि निरुत्साह न्यून होऊन माझे मन उत्साही असते.’

१ ई. सौ. स्मिता बोरकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६६ वर्षे), जुन्नर, पुणे.

१ ई १. सत्संगात सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन ४ वेळा डोळ्यांवरील आवरण काढल्यामुळे मोतीबिंदूचे शस्त्रकर्म टळणे : ‘माझ्या डाव्या डोळ्यात मोतीबिंदू आहे’, असे आधुनिक वैद्यांनी मला सांगितले होते. मोतीबिंदू काढण्यासाठी शस्त्रकर्म करावे लागणार होते. ‘लगेच शस्त्रकर्म करायचे कि नाही ?’, हे आधुनिक वैद्य पुढच्या वेळी तपासणीसाठी गेल्यावर सांगणार होते. त्यानंतर मला सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग लाभला. ११.११.२०२२ या दिवसापासून सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी प्रतिदिन ४ वेळा डोळ्यांवरील आवरण काढण्याचे उपाय चालू केले. २७.११.२०२२ या दिवशी मी दुसर्‍यांदा मोतीबिंदू तपासणीसाठी गेले असता आधुनिक वैद्यांनी मला ‘मोतीबिंदू मुळीच वाढलेला नाही. त्यामुळे लगेच शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नाही’, असे सांगितले. आता उपाय नियमित होत असल्याने माझ्या डोळ्यांना व्यवस्थित दिसत आहे.’

१ उ. सौ. नूतन घाग (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), चिंचवड, पुणे.

१ उ १. प्रत्येक ४ – ५ दिवसांनी हात बधीर होणे आणि हाताचा व्यायाम केल्यावर हाताची स्थिती पूर्ववत् होणे : ‘नोव्हेंबर २०२२ मध्ये माझ्या उजव्या हाताच्या मनगटापासून पुढचा भाग बधीर होऊ लागला होता. साधारण ५ मिनिटांपर्यंत माझा हात बधीर असायचा. असे प्रत्येक ४ – ५ दिवसांनी होऊ लागले. तेव्हा ‘मला अर्धांगवायू झाला आहे का ?’, असे वाटून मला भीती वाटत होती. हाताला बधीरता आल्यानंतर मी हात आणि मनगट पुष्कळ हलवून हाताचा व्यायाम केल्यावर काही कालावधीनंतर माझ्या हाताची स्थिती पूर्ववत् होत होती.

१ उ २. सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप केल्यावर हात बधीर होण्याचे प्रमाण उणावणे आणि त्यानंतर हाताला एकदाही बधीरपणा न येणे : १४.११.२०२२ या दिवशी सांगवी (पुणे) येथे सत्संग झाला. सत्संगात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हा नामजप ५ मिनिटे करण्यास सांगितला. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे माझ्या हाताचा त्रास चालू झाला. तेव्हा मी ‘प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली. त्यांनी मला सूक्ष्मातून ‘सत्संगात घेतलेला जप कर’, असे सुचवले. त्याप्रमाणे मी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा जप ५ – ६ वेळा केला. त्यानंतर माझा हात बधीर होणे उणावले आणि हाताची स्थिती १ – २ मिनिटांत पूर्ववत् झाली. तेव्हापासून आतापर्यंत माझ्या हाताला एकदाही बधीरपणा आला नाही.’

२. सांगली येथील साधकांना आलेल्या अनुभूती

२ अ. सौ. मंजिरी खानझोडे, गावभाग, सांगली.

१. ‘सद्गुरु स्वातीताईंनी शिकवलेल्या ‘मनोरा (टॉवर) मुद्रा’, ‘सगुण-निर्गुण मुद्रा’, ‘वज्रमुठीने डोळ्यांवरील आवरण काढणे’, या ३ पद्धतींनुसार वाईट शक्तीचे आवरण काढल्यावर मला माझे शरीर पुष्कळ हलके वाटू लागले, तसेच माझ्या मनाचा उत्साह वाढला.

२. वास्तूच्या संदर्भातील उपायांमध्ये गोमूत्राने घराची शुद्धी केल्यावर घरातील प्रकाश वाढला आहे, तसेच घरात आनंद जाणवत आहे.’

२ आ. कु. पूनम देसाई, कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली.

१. ‘काही मासांपासून माझे डोळे दुखत होते. सद्गुरु स्वातीताईंच्या सत्संगानंतर मी नियमितपणे डोळ्यांवरील आवरण काढू लागले. त्यामुळे माझे डोळे दुखण्याचे प्रमाण ८० टक्के न्यून झाले आहे.

२. माझ्या मनातील सकारात्मक विचारांचे प्रमाणही वाढले आहे.’

३. कोल्हापूर येथील साधकांना आलेल्या अनुभूती

३ अ. श्री. निगोंडा पाटील, कोल्हापूर

१. ‘सद्गुरु स्वातीताईंनी सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘मनोरा (टॉवर) पद्धती’ने आवरण काढल्यानंतर माझ्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार ९५ टक्के न्यून झाले आहेत.

२. नियमितपणे आवरण काढल्यामुळे माझी एकाग्रता आणि सकारात्मकता वाढली आहे.’

३ आ. सौ. मेघमाला जोशी, कोल्हापूर

१. ‘पूर्वी मला सतत पोटाच्या व्याधी व्हायच्या. ‘नामजप शोधणे, तळहात आणि ‘मनोरा (टॉवर)’ पद्धतीने आवरण काढणे’, हे उपाय केल्यावर माझ्या पोटाच्या व्याधी दूर झाल्या आहेत.

२. पूर्वी मला माझे संपूर्ण शरीर जड असल्यासारखे वाटायचे. आता माझ्या शरिराचा हलकेपणा वाढला आहे.’

४. गोवा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

४ अ. सौ. योगिता शिरोडकर, मडगाव, गोवा.

१. ‘सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनानंतर मी आवरण काढणे चालू केले. पूर्वी मला रात्री झोप लागत नव्हती; मात्र आता ‘प्रतिदिन रात्री डोळ्यांवरील आवरण काढून झोपणे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे’, यांमुळे मला शांत झोप लागत आहे.

२. मध्यरात्री झोपेतून जाग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे.

३. आता सकाळी उठल्यावर मला मरगळ येत नाही. माझा उत्साह वाढला आहे.’

४ आ. सौ. ज्योत्स्ना जगताप, फोंडा, गोवा.

१. ‘मी प्रतिदिन वाईट शक्तींच्या त्रासावरील उपायांसाठीचा नामजप शोधून तो करते. त्यामुळे माझे मन स्थिर रहाते आणि मला सेवा करतांना उत्साह जाणवतो.

२. पूर्वी मला हातदुखीचा त्रास होत असे; पण उपाय करायला लागल्यानंतर मला त्यावर मात करता येत आहे.

३. ‘मनोरा (टॉवर)’ पद्धतीने आवरण काढल्यामुळे मला ढेकर येऊन लगेच हलकेपणा जाणवतो.

४. २ – ३ वेळा आवरण काढल्यावर माझ्या मनाची स्थिती कशीही असली, तरी माझे मन पटकन सकारात्मक होते.

५. मी नियमितपणे डोळ्यांवरील आवरण काढत असल्याने माझ्या डोळ्यांची जळजळ थांबली आहे. पूर्वी मला उपनेत्र (चष्मा) लावले नाही, तर अस्पष्ट दिसायचे. आता डोळ्यांचे आवरण काढल्यानंतर मला उपनेत्र न लावताही व्यवस्थित दिसते.’

संग्राहक : पू. (सौ.) मनीषा महेश पाठक, पुणे (१३.१.२०२३)

वरील लिखाणाचे संकलन करण्यापूर्वी डोकेदुखीचा त्रास होणे आणि संकलन करतांना अनेक वेळा आवरण काढल्यामुळे डोकेदुखी थांबून हलकेपणा जाणवणे

‘वरील लिखाणाचे संकलन करण्यापूर्वी मला डोकेदुखीचा त्रास होत होता. संकलन करायला आरंभ केल्यावर माझ्याकडून अनेक वेळा शरीर आणि डोळे यांवरील आवरण काढले गेले. संकलन पूर्ण होईपर्यंत माझी डोकेदुखी थांबली आणि मला पुष्कळ हलकेपणा जाणवला. ‘धारिकेचे संकलन कधी पूर्ण झाले ?’, हे मला समजलेच नाही.’

– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (१.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक