१. ‘हमास’च्या आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यामागे ‘क्रिप्टो’ (आभासी) चलनाची भूमिका
‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भयानक आक्रमण केल्यानंतर आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी ‘क्रिप्टो’ चलनाचा करण्यात येणारा वापर समोर आला आहे. ‘क्रिप्टो’ चलनामध्ये ते पैसे कुणी दिले ? याची गुप्तता ठेवता येते, तसेच ते परदेशातून त्वरित हस्तांतर करता येते आणि त्यामुळे आतंकवाद्यांना अवैध कामे करण्यास प्रोत्साहन मिळते. ‘ब्लॉक चेन’ यासंबंधीच्या व्यवहाराच्या सार्वजनिक नोंदी निर्माण करत असल्याने वैयक्तिक आणि एका गटाने केलल्या व्यवहाराच्या नोंदी शोधणे अजून कठीण होऊन जाते. आतंकवादी आणि बंडखोर गटांना पैसा पुरवण्यामध्ये क्रिप्टो चलनाच्या भूमिकेविषयी आता छाननी केली जात आहे. इस्रायलने हमासशी संबंधित ‘क्रिप्टो’ची खाती कह्यात घेतली आहेत. हमास आणि त्याच्याशी संबंधित गटांकडून वापरल्या जाणार्या क्रिप्टो चलनाविषयी गंभीरपणे उपाययोजना करण्याची अमेरिकेतील कायदेतज्ञांनी मागणी केली आहे. ‘क्रिप्टो’ चलन हा एक मार्ग आहे, ज्याद्वारे हिंसाचारी आतंकवादी आणि त्यांच्या संघटना पैसा मिळवून त्याचा अपवापर करत आहेत.
२. ‘गूगल’ने इस्रायलमधील नकाशे दाखवणे केले बंद !
इस्रायल आणि गाझा या ठिकाणी इस्रायली सैन्याच्या विनंतीवरून ‘गूगल’ने या भागातील नकाशे दाखवणे बंद ठेवले आहे. गाझामध्ये आक्रमण केल्यानंतर इस्रायली सैन्याच्या विनंतीवरून गाझा पट्टीतील रहदारीविषयीची स्थिती दाखवणे गूगलने बंद केले आहे. याविषयी गूगलचे प्रवक्ते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या संघर्षाच्या वेळी आम्ही जे केले होते, तसेच आता येथील भागातील पिरस्थिती जाणून घेऊन आम्ही या भागातील स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रहदारीविषयीची माहिती आणि व्यवसाय यांविषयीची माहिती दाखवणे तात्पुरते बंद केले आहे.’’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.