पोषण आहारात अंडी नकोच !

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात अंड्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. शाकाहारी चळवळीसह अनेक संघटनांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

शाळेत अनेक जातीधर्मांची मुले एकत्रितपणे शिकत असतात. ज्यामध्ये जैन, मारवाडी, गुजराथी, वारकरी संप्रदायिक, तसेच ब्राह्मणही असतात. अनेकांनी मांसाहाराचे दुष्परिणाम लक्षात घेऊन मांसाहार त्यागला आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलांनाही तो देत नाहीत. पोषण आहारातील अंड्यांपासून बनवलेले पदार्थ घेण्याची विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आलेली नसली, तरी भोवतालचे विद्यार्थी हे पदार्थ चवीने खातांना पाहून मांसाहार न करणार्‍या विद्यार्थ्यांनाही ते खाण्याची इच्छा होऊ शकते. ही मुले घरी पालकांना अंड्याचे पदार्थ बनवण्यासाठी हट्ट करू शकतात. यामुळे पालकांना नाहक मनस्ताप होऊ शकतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अंड्यापासून बनवलेले पदार्थ शालेय पोषण आहारामध्ये देऊच नयेत यासाठी संघटना आग्रही आहेत. अंड्याच्या सेवनामुळे अनेक लाभ होत असले, तरी हे सर्व घटक अन्य शाकाहारी पदार्थ, फळे आणि पालेभाज्या यांतून मिळत असल्याने मुलांना अंडी खाऊ घालण्याचा अट्टहास निरर्थक आहे. ही अंडी येणार्‍या काही कुक्कुटपालन केंद्रांत अस्वच्छता असते. कोंबड्यांना हार्मोन्स वाढवणारी इंजेक्शन देणे, त्यांची अनैसर्गिक पद्धतीने वाढ करणे, अधिक अंडी देण्याची औषधे देणे असे केले जाते. अशा कोंबड्यांनी दिलेली अंडी मुलांसाठी खरंच आरोग्यदायी असतात का ? अंड्याच्या पांढर्‍या भागामुळे पुरळ, सूज, खाज सुटणे, ॲलर्जी, अतिसार, मूत्रपिंड शुद्धीकरणास अडथळा निर्माण होणे इत्यादी समस्या, तर अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल आणि चरबीचे प्रमाण अधिक असते. अध्यात्मशास्त्रानुसार मांसाहार हे मानवाचे खाद्य नव्हे. मांसाहार भक्षणाने शरिरातील तमोगुण वाढतो. मांसाहार म्हणजे जिवाची हत्या असल्याने ते पापकर्म म्हणून गणले जाते. सश्रद्ध अन्नग्रहण करण्यापूर्वी ते भगवंताच्या चरणी अर्पण करतात. मांसाहार भगवंतालाच वर्ज्य असल्याने तो अर्पण कसा करणार ? काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका शाळेत एका शिक्षकाने एका ब्राह्मण विद्यार्थिनीला बळजोरीने अंडे खाऊ घातले. भविष्यात महाराष्ट्रातही असा प्रकार घडल्यास त्याचे दायित्व राज्य सरकार घेणार का ?

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.