रुग्णांची उपसभापती नीलम गोर्हे यांनी घेतली भेट !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती सिद्ध करणार्या आस्थापनातील स्फोटात ६ महिला कर्मचार्यांचा ८ डिसेंबरला होरपळून मृत्यू झाला. त्या घटनेतील १० घायाळ रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार चालू असून त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाकडून कळवण्यात आले आहे. या वेळी ससून रुग्णालयात उपचार चालू असलेल्या रुग्णांची शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी भेट घेतली. तळवडे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे, तसेच पंतप्रधान साहाय्यता निधी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही साहाय्य करण्याविषयी सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
घायाळ रुग्णांची भेट घेतल्यानंतर नीलम गोर्हे म्हणाल्या की, तळवडे येथील घटना गंभीर असून रुग्णांची अवस्था पाहवेनाशी आहे. अशा स्थितीतही एका पीडित व्यक्तीने त्या अवस्थेतही नमस्कार केला आणि ‘ताई आमच्या कुटुंबाच्या मागे उभे रहा’, असे सांगितले. हे शब्द ऐकताच ‘सरकार आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे. एक माणूस म्हणून आम्ही आपल्या कुटुंबासमवेत आहोत, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा’, असे त्यांना सांगितले.