मंदिरांचे पावित्र्य टिकवून गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

म्हार्दोळ (गोवा) येथे गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषद

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सौ. शेफाली वैद्य, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्री. जयेश थळी आणि श्री. रमेश शिंदे

म्हार्दोळ, १० डिसेंबर (वार्ता.)- गोव्याची प्रतिमा देशभरात ‘भोगभूमी’ म्हणून प्रचलित झाली आहे. गोवा म्हणजे कॅसिनो, अर्धनग्न महिला असलेले समुद्रकिनारे, ‘सनबर्न’ असा प्रचार केला जातो; मात्र खरोखर गोव्याची ही संस्कृती आहे का ? गोव्यातील मंदिर संस्कृतीचा प्रचार केला जात नाही; मात्र हल्ली गोवा सरकारने मंदिर संस्कृतीचा प्रचार करायला प्रारंभ केला आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. उत्तरप्रदेशमध्ये ‘काशी विश्‍वेश्‍वर कॉरिडोर’चे (काशी विश्‍वेश्‍वर सुसज्ज मार्गाचे) बांधकाम झाल्यावर तेथील एका वर्षात ८ कोटी पर्यटकांनी भेट दिली, तर गोव्यात समुद्रकिनारे असतांना, कॅसिनो खेळला जात असतांना, तसेच ‘सनबर्न’सारखे महोत्सव आयोजित केले जात असतांना आणि त्यांचा प्रचार करूनही मागील एका वर्षात गोव्याला केवळ ७३ लाख पर्यटकांनी भेट दिली. उत्तरप्रदेशप्रमाणे गोव्यात मंदिर पर्यटनाला चालना दिली पाहिजे; मात्र मंदिर पर्यटनाच्या नावाने केवळ पर्यटन नको, तर मंदिरांचे पावित्र्य टिकवणार्‍या धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना दिली पाहिजे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी सिंहपुरुष सभागृह, श्री महालसा देवस्थान, म्हार्दोळ, फोंडा येथे आयोजित ‘गोवा राज्यस्तरीय मंदिर-धार्मिक संस्था परिषदे’त काढले. या वेळी व्यासपिठावर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि हिंदुत्वनिष्ठ सौ. शेफाली वैद्य या उपस्थित होत्या.

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेला सद्गुरु नीलेश सिंगबाळ, ‘सोशल मिडिया इन्फ्लूएन्झर’ तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ सौ. शेफाली वैद्य, श्री. रमेश शिंदे आणि श्री. जयेश थळी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, कवळे येथील श्री गौड पादाचार्य मठाचे पिठाधीश प.पू. श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी आणि तपोभूमी, कुंडई येथील सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी परिषदेसाठी दिलेल्या शुभसंदेशाचे वाचन करण्यात आले.

फोंडा येथील उद्योजक श्री. जयंत मिरींगकर यांच्या हस्ते सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा, महिला सहकारी संस्थेच्या सौ. हेमश्री गडेकर यांच्या हस्ते सौ. शेफाली वैद्य यांचा, हिंदुत्वनिष्ठ श्री. विनोद वारखंडकर यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समिचीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. सत्यवान म्हामल यांच्या हस्ते गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर सचिव श्री. जयेश थळी यांनी प्रस्तावना करतांना ‘आजच्या धकाधकीच्या जीवनात मंदिर हे मनशांती देणारे केंद्र आहे आणि यामुळे मंदिरांचे संवर्धन अन् जतन होणे आवश्यक आहे. मंदिर विश्‍वस्तांनी एकमेकांमध्ये जवळीक निर्माण करून संघटन भक्कम करणे अत्यावश्यक आहे’, असे सांगितले.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले

१. गोमंतकियांच्या पूर्वजांनी प्राणपणाला लावून पोर्तुगिजांच्या आक्रमणापासून मंदिरांचे रक्षण केले; मात्र या पूर्वजांच्या नावांचा सध्या कुठेही उल्लेख आढळत नाही.

२. गोव्यात काही ठिकाणी विश्‍वस्त, महाजन, पुरोहित आदींमध्ये वाद असल्याचे पहायला मिळते. यामुळे न्यायासाठी प्रकरणे न्यायाप्रविष्ट झाली आहेत. आज न्यायालयात ८ कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत आणि न्याय मिळण्यासाठी पिढ्यान्पिढ्या प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा न्यायव्यवस्थेकडे न्यायाची अपेक्षा ठेवणे ही एक गंभीर सूत्र ठरेल. मंदिरांचा अंतर्गत वाद आपापसांत सोडवला गेला पाहिजे.

३. न्याय मिळवण्यासाठी आपण शासन या एक ‘सेक्युलर’ व्यवस्थेवर अवलंबून राहिल्यास त्याचा गंभीर परिणाम आपणास पुढे भोगावा लागणार आहे. गोवा सोडून इतर ठिकाणी मंदिरांचे सरकारीकरण केले गेले आहे आणि गोव्यात अशी स्थिती निर्माण व्हायला देऊ नये.

४. मोगलांनी उद्ध्वस्त केलेल्या अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिराची पुनर्बांधणी होत आहे, तर गोव्यात पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी का होऊ शकत नाही ? गोव्यातही अशा प्रकारे अनेक ‘अयोध्या’ आहेत आणि पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी झाली पाहिजे.

मंदिरे ही शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक केंद्रे ! – सौ. शेफाली वैद्य, ‘सोशल मिडिया इन्फ्लूएन्झर’ तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ

गोव्यात पूर्वी एक भव्यदिव्य अशी मंदिर संस्कृती होती. ही मंदिरे मराठी शिक्षण आणि संस्कृती यांची केंद्रे होती. या मंदिरांच्या माध्यमातून गोवा हा भारतीय संस्कृतीशी जोडला गेला. पोर्तुगिजांनी हे हेरून हिंदूंची ही संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशाने अगोदर मराठी भाषेतील शिक्षण बंद केले आणि मग मंदिरे नष्ट केली. मंदिरे ही शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक केंद्रे आहेत. मंदिरात पूर्वी शाळा भरायच्या, तेथे कीर्तन, भजन, पूजा-अर्जा व्हायची. त्यामुळे हिंदु मुले लहानपणापासूनच मंदिरांशी जोडली जात असत. मंदिरे ही एक प्राचीन संस्था असून त्यामध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृती यांचे दर्शन होते. मंदिराची मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह आणि शिखर अशी रचना आहे आणि या रचनेचे मनुष्याच्या शरिराच्या रचनेशी साम्य आहे. मंदिरातील मूर्ती म्हणजे साक्षात् परमात्मा आणि मनुष्याचा आत्मा यांचा संबंध आहे.

संतांचे संदेश:

देवभक्तांनो, मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्रे व्हावीत !  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात. देवळातील नित्य पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधींच्या वेळी, तसेच आरतीच्या वेळी साक्षात् देवतेचे चैतन्य प्रक्षेपित होत असते. त्यामुळे मंदिरे ही हिंदूंसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे चैनत्यस्रोत आहेत. अनेकांना मंदिरात गेल्यानंतर मन:शांतीचा अनुभव येतो. त्यासाठी मंदिराचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक आहे आणि म्हणून देवभक्तांनो, मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्र व्हायला हवीत.

मंदिरे आणि धार्मिक संस्था यांचे संघटन होणे काळाची आवश्यकता !  प.पू. श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी, पिठाधीश, श्री गौड पादाचार्य मठ, कवळे, फोंडा

गोमंतक मंदिर धार्मिक संस्था परिषदेचे आयोजन हा एक प्रशंसनीय उपक्रम आहे. सध्याच्या काळात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांचा प्रतिकार करण्यासाठी मंदिरे आणि धार्मिक संस्था यांचे संघटन होणे काळाची आवश्यकता आहे. या कार्याला माझा आशीर्वाद आहे.

उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवर उद्बोधन सत्र आणि परिसंवाद झाले. परिषदेला सुमारे २५० मंदिरांचे विश्‍वस्त, समितीचे सदस्य, भक्त आदींची उपस्थिती होती. परिषदेत सूत्रसंचालन सौ. सुमेधा नाईक आणि श्री. राहुल वझे यांनी केले.