रेणुका भक्त संघटनेकडून राजेश क्षीरसागर यांचे आभार !संघटनेने मागणी केल्याप्रमाणे प्रयत्न करून खोळंबा आकार आणि दर अल्प केल्याविषयी रेणुका भक्त संघटनेने श्री. क्षीरसागर यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. या प्रसंगी अध्यक्ष श्री. युवराज मोळे, उपाध्यक्ष श्री. तानाजी चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. अशोकराव जाधव, सरचिटणीस श्री. गजानन विभूते, सौ. लता सोमवंशी यांसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. |
कोल्हापूर – कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी प्रतिवर्षी कोल्हापूर येथून २०० हून अधिक एस्.टी. गाड्यांतून भाविक जातात. या यात्रेसाठी एस्.टी. महामंडळाच्या वतीने ‘खोळंबा आकार’ (यात्रेच्या कालावधीत एस्.टी. एका जागेवर थांबते त्यासाठी आकारले जाणारे शुल्क) प्रतिघंटा ९८ रुपयांवरून नाममात्र २० रुपये करण्यात आला आहे. विशेषकरून यात्रेसाठी ३०० रुपये किलोमीटरप्रमाणे दर न लावता प्रत्यक्ष चालवण्यात आलेल्या किलोमीटरला ५५ रुपयांप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सौजन्य एस् न्यूज कोल्हापूर
श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘सौदत्ती यात्रेसाठी दर आणि खोळंबा आकार अल्प करण्यासाठी मी २१ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासाठी विनंती केली होती. त्यांनी तातडीने परिवहन मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चन्ने यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता यात्रेसाठी जेवढे किलोमीटर बस धावेल तेवढाच आकार घेण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये होत असलेली यात्रा आणि वर्ष २०२४ मध्ये माघ मासात होणारी यात्रा अशा दोन्हींसाठी हे लागू असेल. रेणुका भक्त संघटनेने महिलांना अर्धे तिकीट मिळावे, अशी मागणी केली असून त्यासाठी पुढच्या वर्षी प्रयत्न करू.’’