सावंतवाडी : असंतुलित रासायनिक खतांमुळे भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे उत्पादित होणारे अन्न विषारी उत्पादित होते. जर प्रत्येक नागरिकाला विषमुक्त अन्न हवे असेल, तर प्रत्येकाने भूमीचे रक्षण करण्यासाठी, तसेच तिच्यातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. मातीतील जैवविविधता नष्ट झाली, तर संपूर्ण सृष्टीचक्र बिघडून जाईल, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्गचे शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांनी केले आहे.
५ डिसेंबर या ‘जागतिक मृदादिना’निमित आंबोली येथे कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग आणि कृषी विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृदा चाचणी अधिकारी प्रवीण ओहळ, तालुका कृषी अधिकारी गोरे, मंडल कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
या वेळी शास्त्रज्ञ धामापूरकर पुढे म्हणाले,
१. भूमी हा सृष्टीचा मूलभूत आधार आहे. मानवी जीवनाच्या अपरिमित आवश्यकता पूर्ण करण्याचे काम भूमी अविरतपणे करत आहे. सृष्टीवरील ९० टक्क्यांहून अधिक सजीव आपले जीवन मातीमध्ये पूर्ण करतात. भूमीवरील सजीव सृष्टीचा मानवी जीवनावर थेट परिणाम होत असतो.
२. शेतकरी अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी असंतुलीत खताचा वापर करतांना दिसतात. त्यामुळे मातीतील अनेक जीव संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता येणार्या पिढीसाठी जर भूमी सुदृढ ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने भूमीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आगामी काळात शेतकरीबंधूंनी केवळ रासायनिक किंवा एकात्मिक खत व्यवस्थापन न करता अधिकाधिक सेंद्रिय खत, जीवामृत यांचा वापर करावा. त्यामुळे भूमीतील जीवसृष्टी जिवंत राहील आणि भूमी जिवंत रहाण्यासाठी साहाय्य होईल.
३. संपूर्ण जगामध्ये माणसाच्या आरोग्याला आवश्यक असणारी प्रतिजैविके सिद्ध करण्यासाठी भूमीतील उपयुक्त जीवजंतूंचा वापर केला जातो. त्याचबरोबर या जीवसृष्टीमुळेच प्रत्येक जिवाला चांगल्या प्रतीचे अन्नधान्य मिळते. त्यामुळे येणार्या काळात मातीतील ही संपूर्ण सजीव सृष्टी कशी टिकेल ? यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.