Indian Navy Day 2023 : नौदलाकडून स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांचा सन्मान !

‘चिफ ऑफ द नेव्हल स्टाफ’ पदक प्रदान

मालवण (सिंधुदुर्ग) : भारतीय नौदलाने तारकर्ली येथे ४ डिसेंबर या दिवशी झालेल्या नौदलदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘राजकोट’ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुतळ्याच्या स्थापनेसाठी भूमीची निश्‍चिती करणे, पर्यायी भूमी शोधणे, तसेच अन्य कार्यवाही करणे, यांसाठी प्रशासनाचे प्रमुख म्हणून मालवण तहसीलदारांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे नौदलाच्या ‘ऑपरेशन डेमो’च्या सर्व पैलूंचा नागरी प्रशासनाशी समन्वय साधण्यात तहसीलदार वर्षा झालटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. या कार्यक्रमासाठी सुयोग्य सुरक्षा व्यवस्था केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वेळेत उभारण्याबद्दल आणि रस्त्यांची कामे वेळेत केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे साहाय्यक अभियंता अजित पाटील यांचा नौदलाच्या वतीने ‘चिफ ऑफ द नेव्हल स्टाफ’ हे पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन ५ डिसेंबर या दिवशी सत्कार करण्यात आला. या वेळी नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल हरि कुमार, व्हाईस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांसह अन्य नौदल अधिकारी उपस्थित होते.

मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांचा सन्मान करतांना नौदल अधिकारी

मालवण नगरपालिकेकडून अग्नीशमन पथकांचा सत्कार !

या कार्यकमासाठी महाराष्ट्र राज्यातून अग्नीशमन दलाची अनेक पथके आली होती. कार्यक्रम झाल्यानंतर ५ डिसेंबर या दिवशी ही पथके परतीच्या प्रवासाला निघाली. या वेळी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी या सर्व पथकांना मानपत्र दिले आणि सर्व कर्मचार्‍यांचा सत्कार केला. सर्व पथके मार्गस्थ होत असतांना नगरपालिकेने भोंगा वाजवून (सायरन) त्यांना शुभेच्छा दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून प्रशासनाचे आभार !

नौदलदिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, एस्.टी. महामंडळ, महावितरण, आरोग्य विभाग यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणांनी चांगली साथ दिली. जनतेचेही चांगले सहकार्य लाभले. यासाठी भाजपच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेण्यात आली आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.