इस्रायल आणि हमास यांच्यात ६ दिवसांचा युद्धविराम झाला असला, तरी हा युद्धविराम पूर्ण शांततेकडे जाण्याची अजिबात शक्यता नाही, उलट हे युद्ध दुसर्या शीतयुद्धाची नांदी ठरण्याची शक्यता दिसत आहे. भारताचा विचार करता भारताने या युद्धात तटस्थ भूमिका घेतली, तरी ती अमेरिका-इस्रायलकडे झुकलेली ठेवावी लागणार आहे; कारण भारताचे या देशांशी हितसंबंध दृढ होत आहेत. जग आणि अमेरिकेसारखी सत्ता या युद्धात गुंतलेली असेल, तर चीनचा आशियातील साहसवाद वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एकंदरच या सर्व घडामोडी जगासाठी चिंता निर्माण करणार्या आहेत.
१. इस्रायल-हमास युद्धात इराणकडून आतंकवादी संघटनांचा सहभाग आणि अमेरिकेने केलेली कारवाई !
इस्रायल-हमास युद्धाने जग पुन्हा दोन गटांत विभागले गेलेले दिसत आहे. हमासला इराण, रशिया आणि चीन यांनी उघड पाठिंबा दिला आहे, तर इस्रायलच्या साहाय्यासाठी अमेरिकेने स्वतःचे नौदल भूमध्य सागरात आणून उभे केले आहे. पश्चिम आशियातील राजकारणात इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये चीनने मध्यस्थी केल्यानंतर इराणचा प्रभाव वाढतांना दिसत आहे. इराणचा असा प्रभाव वाढणे, हे अमेरिकेच्या भूराजनैतिक धोरणासाठी घातक आहे. विशेषत: अब्राहम करारानंतर सौदी अरेबिया आणि अरब अमिरात अमेरिकेच्या भूराजनैतिक व्यूहात सामील होण्याची सिद्धता करत असतांनाच हमासने इराणच्या प्रेरणेने हे आक्रमण करून या व्यूहात खोडा घातला आहे. त्यामुळेच हमास आणि इस्रायल यांच्यातील ६ दिवसांच्या युद्धविरामाचा लाभ अमेरिका अन् इस्रायल यांनी इराण पुरस्कृत ‘हिजबुल्ला’ आणि ‘हुती’ यांच्या आतंकवादी तळांवर आक्रमण करण्यासाठी घेतला. या दोन्ही आतंकवादी संघटनांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांद्वारे आक्रमणे केली आहेत.
‘हिजबुल्ला’ ही संघटना लॅबेनॉन आणि सीरिया येथून, तर ‘हुती’ ही दुसरी इराणपुरस्कृत संघटना येमेनमधून इस्रायलवर आक्रमणे करत आहे. हुतीने तर अमेरिकेच्या विमानवाहू नौकांवरही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. हुतीने इस्रायलवर ४५ क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १९ ड्रोनच्या साहाय्याने आक्रमण केले आहे. त्यामुळे इस्रायल आणि पूर्व भूमध्य सागरापर्यंत मर्यादित असलेले हे युद्ध तांबड्या समुद्रापर्यंत पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायल किंवा अमेरिका यांच्या समवेतच्या युद्धात अधिकृतपणे भाग घेण्याऐवजी इराणने ‘हिजबुल्ला’ आणि ‘हुती’ या आतंकवादी संघटना स्थापून त्यांच्याद्वारे हे युद्ध लढण्याचे ठरवलेले दिसते; पण या दोन्ही संघटनांनी केलेली आक्रमणे त्यांना महागात पडत आहेत, असे सध्या तरी दिसत आहे; कारण या संघटनांवरील प्रतिआक्रमणात इस्रायलसह अमेरिकेच्या विमानवाहू नौकेवरील लढाऊ विमानांनीही भाग घेतला आहे. ‘हुती’ आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेने तांबड्या समुद्रातही स्वतःच्या युद्धनौका पाठवल्या आहेत आणि तेथून अमेरिकेने ‘हुती’चे क्षेपणास्त्र रडार आणि तळ यांवर आक्रमण करून ते नष्ट केले आहेत.
२. अमेरिका आणि चीन यांच्या दृष्टीने इस्रायल-हमास युद्धातील सहभाग !
इस्रायलनेही लॅबेनॉन आणि सीरिया येथील ‘हिजबुल्ला’च्या भूमीगत तळांवर आक्रमणे केली आहेत. अमेरिकेने ‘आयसेनहॉवर’ ही विमानवाहू नौका ताफ्यासह इराणपासून ३०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात तैनात केली आहे. या ताफ्यात क्षेपणास्त्रे डागू शकणार्या युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत, तर पूर्व भूमध्य समुद्रात अमेरिकेने ‘जेराल्ड फोर्ड’ ही विमानवाहू नौका ताफ्यासह उभी केली आहे. ही युद्धनौका लॅबेनॉन, सीरिया आणि पश्चिम इराणमधील लक्ष्यांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करू शकते. आतापर्यंत इराणने प्रत्यक्षपणे या युद्धात भाग घेतलेला नाही; पण ‘हिजबुल्ला’ आणि ‘हुती’ या आतंकवादी संघटनांना पुढे करून तो सहभागी झाला आहे. इराणने या दोन पुरस्कृत आतंकवादी संघटनांद्वारे का होईना; पण या युद्धात भाग घेणे रशियाच्या हिताचे आहे. त्यामुळे एकतर अमेरिकेचे युक्रेन युद्धाकडे दुर्लक्ष होईल आणि दुसरे, म्हणजे रशियन युद्धसामुग्रीला इराणकडून मागणी मिळेल. चीनलाही अमेरिका पश्चिम आशियातील युद्धात अडकणे सोयीचे आहे. त्यामुळे तैवानकडे अमेरिकेचे दुर्लक्ष होईल, असे चीनलाही वाटते. अमेरिका या युद्धात गुंतल्यास ‘नाटो’च्या (उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या) सदस्य देशांनाही या युद्धात सहभागी व्हावे लागेल.
३. इस्रायल-हमास यांच्या युद्धानंतर उद्भवणारी जागतिक परिस्थिती !
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही ‘आपण कणखर नेते आहोत’, हे येत्या निवडणुकीत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे ते इराणविरुद्धच्या कारवाईला गती देण्याची शक्यता आहे. हमासवरील कारवाई पूर्ण झाल्यावर इस्रायल ‘हिजबुल्ला’वरील आक्रमणाचे निमित्त करून इराणमधील अणूकेंद्र आणि अन्य सैनिकी तळ यांवर आक्रमणे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात अमेरिकाही सहभागी होईल. तसे झाल्यास रशिया आणि चीन हे अरबी, तांबडा अन् भूमध्य समुद्र यांत आपल्या नौदलाचा वावर वाढवतील. चिनी नौदलाचा अरबी समुद्रातील वावर भारतासाठी डोकेदुखी वाढवणारा असणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलालाही सावध रहावे लागेल. थोडक्यात पश्चिम आशियातील स्थिती अधिक स्फोटक बनून पश्चिम आशियाई देशांशी होणार्या भारताच्या व्यापारावर ताण येऊ शकेल.
४. इस्रायलसमोरील आव्हान !
तिकडे इस्रायलने उत्तर गाझा पट्टीतील स्वतःची कारवाई जवळजवळ पूर्ण केली आहे. हमासची भुयारातील सर्व ठाणी नष्ट केली आहेत, तसेच रुग्णालयात स्थापन केलेली ठाणी निर्दयपणे मोडून काढली आहेत. असे असले, तरी आता दक्षिण गाझा पट्टीतील कारवाई अधिक कठीण असणार आहे; कारण गाझातील सर्व पॅलेस्टाईन नागरिक दक्षिण भागात एकवटले आहेत. त्यामुळे तेथील हमासच्या भुयारांवर आक्रमण करणे अवघड होणार आहे. तसेच ही भुयारे भूमीखालून इजिप्तच्या भूप्रदेशात घुसली असण्याची शक्यता इस्रायली संरक्षण दलाने व्यक्त केली आहे. तसे असल्यास इजिप्तच्या भूप्रदेशात प्रवेश करून ती नष्ट करावी लागतील. इजिप्त त्याला सिद्ध होण्याची शक्यता अल्प असेल किंवा इजिप्त स्वतःच्या सुरक्षादलांकडूनच हे काम करून घेईल. हे सर्व युद्धाची व्याप्ती वाढवणारे आणि पुरवठा साखळ्यांवर ताण निर्माण करणारे आहे.
५. रशियापुढील आव्हाने !
पश्चिम आशियातील या युद्धामुळे युक्रेन युद्धाकडे जगाचे दुर्लक्ष होते आहे, हे रशियासाठी लाभाचे असले, तरी हे युद्ध रशियावरचा आर्थिक ताण वाढवणारे ठरणार आहे, तसेच अमेरिका या युद्धात उतरलेली असल्यामुळे इराणचा प्रभाव न्यून झाल्यास ते रशियासाठी अडचणीचे ठरू शकते. युक्रेन युद्धाच्या प्रारंभीच्या काळात भारतासारख्या देशाने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी केल्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेचा दम टिकून होता; पण आता ही खरेदी न्यून झाली आहे. असे असले, तरी पश्चिम आशियात युद्ध भडकले आणि त्याची व्याप्ती वाढली, तर रशियाचा उरलासुरला तेल व्यापारही बंद होण्याची शक्यता आहे. सीरिया हा रशियाचा या भागातील एक भरवशाचा मित्र आहे; पण अमेरिका आणि इस्रायल यांच्या पुढे सीरियाचा निभाव लागणे कठीण आहे. त्यामुळे सीरियाने इस्रायली आक्रमणांना प्रत्युत्तर देण्याचे टाळले आहे.
‘या युद्धामुळे आपल्या शस्त्रास्त्रांना इराण, सीरिया आणि लॅबेनॉन यांच्याकडून मागणी येईल, अशी रशियाची अपेक्षा आहे. दुबईत १३ ते १७ नोव्हेंबर या काळात झालेल्या ‘दुबई एअरशो’ या प्रदर्शनात रशियाने त्याच्या आधुनिक युद्धसामुग्रीचे प्रदर्शन मांडले होते; पण युक्रेन युद्धानंतर ‘रशियाच्या उत्पादनांचा दर्जा कायम राहिला नाही’, असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रशियाला या प्रदर्शनातून फारसा लाभ झाला नाही.
६. भारतासाठी निर्माण होणार्या समस्या !
हमास आणि इस्रायल युद्धाची व्याप्ती भारतासाठी अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. एकतर या युद्धामुळे भारत पश्चिम आशिया आणि युरोप हा आर्थिक महामार्ग लांबणीवर पडला आहे. दुसरे भारताला अरब देश आणि इराण यांच्याकडून होणारा तेलपुरवठा अडचणीत येणार आहे. इराणवरची आक्रमणे वाढली, तर तेथील चाबहार बंदरातील भारताचे दळणवळणही अडचणीत येऊ शकते. एकंदरच या युद्धाच्या निमित्ताने जगभरात होणार्या सर्व घडामोडी जगासाठी चिंता निर्माण करणार्या आहेत.
– दिवाकर देशपांडे
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, १.१२.२०२३)
संपादकीय भूमिकाइस्रायल – हमास युद्धामुळे भारतासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींचा विचार करून त्यावरच सरकारने आताच उपाय योजना काढणे आवश्यक ! |