पुणे – शहरातील रुबी, जहांगीर, पुना रुग्णालय, संचेती रुग्णालय, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, आदित्य बिर्ला रुग्णालय ही सर्व रुग्णालये धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येतात; मात्र हे रुग्णांना ठाऊक नसल्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील आणि विनामूल्य उपचारांच्या योजनेपासून वंचित रहातात. याची जाणीव ठेवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता, तसेच मुख्यमंत्री आणि धर्मादाय आयुक्त यांना पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे आता पुण्यातील ५६ धर्मादाय रुग्णालयांना ‘धर्मादाय’ हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.
धर्मादाय शब्द लावण्याविषयीचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे !
- राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे कि नाही याची माहिती होईल. त्यामुळे रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येतील.
- राज्यात एकूण ४३० धर्मादाय रुग्णालये असून त्याअंतर्गत १० टक्के खाटा या १ लाख ८० सहस्र वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी, तर आणखी १० टक्के खाटा या निर्धन ८५ सहस्र वार्षिक उत्पन्न असणार्या रुग्णांसाठी राखीव आहेत.
- आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये ५० टक्के सवलत, तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे विनामूल्य उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने वर्ष २००३ मध्ये एका निकालाद्वारे केली आहे.
संपादकीय भूमिका‘धर्मादाय’ हा शब्द आतापर्यंत का लावला नाही ? हेही पहायला हवे ! |