BJP Victory Celebration : भाजपचा ३ राज्यांतील विजय गोव्यातही जल्लोषात साजरा !

सनातनविरोधी ‘इंडिया’ आघाडी जनतेने नाकारली ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यातही जल्लोष !

पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) : भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे बहुमताने सत्ता संपादन केल्याचा विजयोत्सव गोव्यातील भाजपनेही साजरा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथील पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा विजय साजरा केला.

डावीकडून अधिवक्ता नरेंद्र सावईकर, खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दामू नाईक

याप्रसंगी आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाने हल्लीच एकत्र येऊन सनातनविरोधी ‘इंडिया’आघाडी स्थापन केली होती. ३ राज्यांत भाजप बहुमताने विजयी झाल्याने सनातनविरोधी ‘इंडिया’ आघाडी जनतेने नाकारल्याचे स्पष्ट होत आहे. सनातन धर्माला विरोध करणार्‍यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. या निवडणुकीतून जनभावना लक्षात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० हून अधिक जागा संपादन करून पुन्हा सत्तेवर येणार आहे. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार आहे.’’ पत्रकार परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, अधिवक्ता नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सबका साथ, सबका विश्‍वास, सबका विश्‍वास’ या अंत्योदय तत्त्वावर भाजपने तिन्ही राज्यांत विजय मिळवला आहे. सर्व ठिकाणी ‘मोदी मॉडेल’ यशस्वी ठरले आहे. तेलंगाणामध्ये भाजपला पूर्वीच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्या आहेत.’’

३ राज्यांचा विजय जनतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती असलेली भावना प्रदर्शित करतो ! – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

पणजी : ३ राज्यांत भाजपने मिळवलेला विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती जनभावना कशी आहे ? हे लक्षात येते. जनतेला पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आणायचे आहे.

मी मध्यप्रदेश येथे भाजपचा कार्यकर्ता या नात्याने प्रचारात सहभाग घेतला. मी मध्यप्रदेश येथे ज्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झालो ते सर्व ९ उमेदवार निवडणूक जिंकले आहेत, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले.