२६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत होणार ‘जिल्हा मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

  • ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मध्ये समान कृती कार्यक्रम निश्‍चित !

  • १२ मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू होणार !

ओझर (जिल्हा पुणे), ३ डिसेंबर (वार्ता.) – येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची ३ डिसेंबर या दिवशी सांगता झाली. २ दिवसांसाठी आयोजित या परिषदेमध्ये उपस्थित राहिलेल्या विश्‍वस्तांनी २६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे सांगितले, तर १६ जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ घेण्यात येणार आहे. परिषदेच्या समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत निश्‍चित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांची माहिती हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी परिषदेच्या सांगता समारंभाच्या वेळी दिली.

 समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे !

  •  १२ मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू करणार !
  •  १० मंदिरांमध्ये धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन नियमितपणे लावण्याचे निश्‍चित !
  •  मंदिरापासून ५०० मीटर अंतरामध्ये मांस-मद्य विक्री होऊ नये, यासाठी ३२ ठिकाणी विश्‍वस्तांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले जाणार !
    ७३ मंदिरांमध्ये धर्मशिक्षण फलक लावण्याची विश्‍वस्तांची सिद्धता !